30 पेक्षा अधिक एकत्र जणांच्या एकत्र येण्यावर बंदी : मोठी पार्टी केल्यास दंड : जगभरात 2.33 कोटी कोरोना रुग्ण
2 वर्षात संपू शकते कोरोना महामारी
जगभरात कोरोना विषाणूची बाधा आतापर्यंत 2 कोटी 34 लाख 01 हजार 402 जणांना झाली आहे. यातील 1 कोटी 59 लाख 35 हजार 608 बाधित महामारीतून मुक्त झाले आहेत. ब्रिटनमध्ये पोलिसांनी एकाचवेळी 30 पेक्षा अधिक जणांच्या एकत्र येण्यावर बंदी घातली आहे. तसेच कुठल्याही प्रकारची पार्टी किंवा कार्यक्रम आयोजित करणाऱयांवर 10 हजार पौंडचा (सुमारे 1 लाख रुपये) दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. जे लोक अशा कार्यक्रमांमध्ये सामील होतील किंवा मास्क न वापरणाऱया लोकांकडून 100 पौंड (सुमारे 10 हजार रुपये)चा दंड वसूल केला जाणार आहे. दुसऱयावेळी नियमांचा भंग करणाऱयांकडून दुप्पट दंड आकारण्यात येणार आहे. परंतु स्कॉटलंड, वेल्स आणि आयर्लंड राज्य 30 पेक्षा अधिक 30 पेक्षा अधिक लोकांना एकाठिकाणी एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी नियम तयार करू शकतात.

कोरोना महामारीसंबंधी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस गेब्रियेसस यांनी अत्यंत मोठे विधान केले आहे. महामारी दोन वर्षांमध्ये समाप्त होऊ शकते. 1918 मध्ये स्पॅनिश फ्ल्यू संपुष्टात येण्यासही दोन वर्षांचा कालावधी लागला होता. सद्यकाळात तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली असल्याने कोरोनाला कमी काळात रोखले जाऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.
तंत्रज्ञान अन् ज्ञान
टेड्रोस यांनी जिनिव्हा येथे एका ऑनलाईन पत्रकार परिषदेत हे विधान केले आहे. आमच्याकडे महामारी रोखण्याचे तंत्रज्ञान आणि ज्ञान दोन्हीही आहे. इतिहासात डोकावून पाहिल्यास अर्थव्यवस्था आणि समाजात परिवर्तनामुळेच महामारी फैलावल्याचे निदर्शनास येईल असे टेड्रोस म्हणाले.
भ्रष्टाचार हत्येसमान
पीपीईशी संबंधित भ्रष्टाचार हत्यासमान गुन्हा आहे. हा गुन्हा कदापिही स्वीकारला जाऊ शकत नाही. आरोग्य कर्मचारी पीपीईशिवाय काम करत असल्यास ते आमच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकत आहेत. पीपीईत भ्रष्टाचार होणे म्हणजे अशा आरोग्य कर्मचाऱयांचा जीव धोक्यात टाकणे असल्याचे टेड्रोस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले आहे.
भारताचे कौतुक
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या भारताच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. भारतात संसर्ग अत्यंत वेगाने फैलावत नसला तरीही याचा धोका कायम आहे. याच कारणामुळे सतर्क राहण्याची गरज असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
लोकसंख्येची घनता अन् धोका
भारतात कोरोनाचे बाधित 3 आठवडय़ांमध्ये दुप्पट होत असले तरीही रुग्ण सातत्याने वाढत आहेत. बांगलादेश, पाकिस्तान आणि दक्षिण आशियाच्या लोकसंख्येची अधिक घनता असलेल्या देशांमध्येही अद्याप महामारीची स्थिती स्फोटक झालेली नाही, परंतु असे घडण्याची जोखीम कायम असल्याचे डब्ल्यूएचओचे आरोग्य आपत्कालीन कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक
डॉ. माइक रेयान यांनी नमूद केले आहे. सामूहिक स्तरावर संसर्ग सुरू झाल्यास तो अत्यंत वेगाने फैलावणार आहे. भारतात लोकांचा वावर पुन्हा सुरू झाल्याने संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.
दुप्पटीच्या वेगावर लक्ष
भारतात कोरोनाबाधितांची संख्या 130 कोटी लोकसंख्येच्या हिशेबाने अत्यंत अधिक नाही. परंतु संसर्ग वाढण्याचा दर आणि रुग्ण दुप्पट होण्याच्या वेगावर नजर ठेवणे महत्त्वाचे असल्याचे उद्गार डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी काढले आहेत.
आयुष्मान भारत
आयुष्मान भारत योजनेद्वारे कोरोना संकट हाताळण्यास मदत मिळणार आहे. अनेक देशांसमोर गंभीर आव्हाने आहेत, परंतु यातूनही संधी शोधाव्या लागणार आहेत. भारतासाठी आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती वाढविण्याची ही संधी असू शकते, असे टेड्रोस यांनी म्हटले आहे.
पेरू : पार्टीत चेंगराचेंगरी
पेरूची राजधानी लिमामध्ये शनिवारी महामारीशी संबंधित नियमांचे उल्लंघन करत आयोजित करण्यात आलेल्या पार्टीवर पोलिसांनी छाप्गग टाकल्यावर चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत 13 जणांचा मृत्यू झाला असून 6 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 3 पोलिसांचा समावेश आहे. छापा टाकण्यात आलेल्या नाइटक्लबमध्ये केवळ एकच दरवाजा होता. पोलिसांचा छापा पडताच सर्वजण त्यातूनच बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागल्याने चेंगराचेंगरी घडली आहे. विनाअनुमती पार्टी करणाऱया 23 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.
मेक्सिको : 60 हजार बळी

मेक्सिकोमध्ये दिवसभरात 6,482 नवे रुग्ण सापडले असून 644 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर बळींचे एकूण प्रमाण 60,254 वर पोहोचले आहे. देशातील रुग्णसंख्या 5,56,216 झाली आहे. बळींप्रकरणी अमेरिका आणि ब्राझीलनंतर मेक्सिकोचा क्रमांक लागतो. मेक्सिको सरकारने चालू आठवडय़ात देशात रशियाच्या लसीची मानवी चाचणी करण्यास मंजुरी दिली आहे.
ब्राझील : 50 हजार रुग्ण

मागील 24 तासांमध्ये ब्राझील येथे 50 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. याचबरोबर देशात बाधितांचा आकडा 35 लाखापार पोहोचला आहे. दिवसभरात 892 जणांना जीव गमवावा लागला आहे. देशातील बळींचे प्रमाण 1,14,277 झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे पथक 5 दिवसांच्या दौऱयावर पोहोचले आहे.
इटली : रोममध्ये संकट

इटलीच्या रोम क्षेत्रात संसर्ग वाढत आहे. आरोग्य मंत्रालयानुसार येथे मागील 24 तासांमध्ये 215 नवे बाधित सापडले आहेत. सार्डीनिया येथे सुटी व्यतित करून परतणाऱया लोकांचे यात प्रमाण अधिक आहे. रोममध्ये मार्चपासूनच टाळेबंदी लागू करण्यात आली होती. मागील आठवडय़ात तेथे निर्बंध शिथिल करत बाहेरील लोकांना येण्याची मंजुरी देण्यात आली होती. देशात आतापर्यंत 2 लाख 58 हजार 136 रुग्ण सापडले आहेत.
फ्रान्स : 3,602 नवे रुग्ण

फ्रान्समध्ये मागील 24 तासांमध्ये 3,602 नवे बाधित सापडले आहेत. देशातील रुग्णसंख्या आता 2 लाख 38 हजार 2 झाली आहे. तेथे आतापर्यंत 30 हजार 512 जणांना जीव गमवावा लागला आहे. देशात सद्यकाळात 380 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सरकारने राजधानी पॅरिस समवेत देशाच्या अनेक भागांमध्ये मास्कचा वापर अनिवार्य केला आहे.
मुलांसाठी महत्त्वपूर्ण सूचना

जागतिक आरोग्य संघटनेनुसार 12 पेक्षा अधिक वयाच्या मुलांनी प्रौढांप्रमाणेच मास्कचा वापर करावा. 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी सामान्य स्थितीत मास्कचा वापर करण्याची गरज नाही. 6 ते 11 वयोगटातील मुले जर वृद्ध किंवा संसर्गाचा धोका असणाऱया अन्य लोकांच्या संपर्कात येत असल्यास त्यांच्यासाठीही मास्क परिधान करणे गरजेचे आहे.
रशियात रुग्ण वाढले

रशियात दिवसभरात 4,852 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. देशातील रुग्णसंख्या आता 9,56,749 झाली आहे. प्रतिदिन रुग्ण वृद्धी दर 0.5 टक्के इतका आहे. मॉस्कोमध्ये 611 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 180 रुग्ण सेंट पीटर्सबर्ग येथे सापडले आहेत. दिवसभरात देशात 73 बाधित दगावले आहेत. 3,162 बाधितांना महामारीपासून मुक्तता मिळाली आहे.









