अयोध्येमधील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाले, आता ‘रामराज्य’ कसे आणायचे यावर लक्ष केंद्रित करावयास हरकत नाही. पण त्यासाठी ‘रामराज्य’ कसे असते हे प्रथम जाणून घ्यावयास हवे. संतश्रेष्ठ तुकाराममहाराज आपल्या एका सुंदर अभंगात त्यांनी ‘रामराज्य’ कसे आणले याबद्दल वर्णन करताना म्हणतात,
झाले रामराज्य काय उणे आम्हांसी । धरणी धरी पीक गायी वोळल्या म्हैशी ।।1।।राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये ।दळिता कांडितां जेविता गे बाईये ।।2।।स्वप्नीही दु:ख कोणी न देखे डोळा ।
नामाच्या गजरे भय सुटले कळिकाळा ।।3।।तुका म्हणे रामे सुख दिले आपले ।तया गर्भवासी येणे जाणे खुंटले ।।4।।
तुकाराम महाराज वरील अभंगात सांगतात, रामराज्य आले आता आम्हाला काय उणे आहे? पृथ्वी भरपूर पीक देत आहे. गाई, म्हशी भरपूर दूध देत आहेत. अहो बायांनो, आता दळता कांडता आपण रामाच्या ओव्या गाऊ. रामनामाच्या गजराने कली-काळास भय सुटले व कोणालाही स्वप्नातही दु:ख प्राप्त होत नाही, असे आत्मसुख श्रीरामांनी सर्वाना दिले म्हणून सर्वांचे गर्भवास चुकले.
सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की ‘रामराज्य’ हे आत्मिक सुख प्राप्त करून देते. शारीरिक सुख नाही. जोपर्यंत आपण केवळ शारीरिक किंवा इंद्रियतृप्ती हे जीवनाचे लक्ष्य मानून जीवन जगतो तोपर्यंत रामराज्य शक्मय नाही. रामराज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचे ध्येय असते श्रीरामांना प्रसन्न करणे, स्वतःच्या इंद्रियांना नाही. मग
श्रीराम कशाने प्रसन्न होतात हे कसे जाणायचे? जो गर्भवासातून म्हणजे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी यातून स्वतःला मुक्त करण्यासाठी प्रयत्न करतो तोच श्रीरामांना प्रसन्न करू शकतो.
रामराज्यामध्ये जनता केवळ आहार, निद्रा, भय, मैथुन यासाठी आपले अमूल्य मनुष्य जीवन वाया घालवत नाही. या गरजा पशु-पक्ष्यांनासुद्धा श्रीरामाच्या कृपेने प्राप्त होतात. मग मनुष्याला का होणार नाहीत? रामराज्यामध्ये मनुष्य केवळ अन्न, वस्त्र, निवारा यासाठीच आपले अमूल्य मनुष्य जीवन वाया घालवत नाही. यासाठी नागरिक शेती, फळबागा, फुलबागा इत्यादी व्यवसाय करतात. त्यामुळे अन्नाचा कधीच तुटवडा भासत नाही. त्याचप्रमाणे गायी, म्हशींचे पालन केल्याने घरामध्ये दूध, दही, ताक, तूप त्याचप्रमाणे शेतीसाठी लागणारे सेंद्रीय खत पैसे न खर्च करता प्राप्त होते. गायी म्हशांचे पालन हे घरातल्या एका व्यक्तीचे पालन केल्याप्रमाणे केले जाते. त्यांना कधीही कत्तलखान्यात विकले जात नाही.
रामराज्यामध्ये ज्ञानप्राप्तीसाठी भगवद्गीता, भागवत, रामायण, महाभारत या सारख्या ग्रंथांच्या माध्यमातून श्रीराम कोण आहेत, त्यांना कसे जाणून घ्यावे, त्यांचा आणि आपला काय संबंध आहे इत्यादींचा अभ्यास केला जातो. हे ज्ञान परिपूर्ण असून सृष्टीच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत गुरुशिष्य परंपरेतून चालत आले आहे. बाकी सर्व विषयांचे ज्ञान परिस्थितीनुसार बदलत असते पण वर उल्लेख केलेल्या ग्रंथातील ज्ञान हे कधीही बदलत नाही, कारण ते सनातन म्हणजे कधीही न बदलणारे, अविनाशी सत्य आहे.
रामराज्यामध्ये श्रीराम हा राजा आहे व त्याची प्रेमपूर्वक सेवा करणे हा प्रत्येक नागरिकाचा स्वभाव आहे. सर्व नागरिक केवळ श्रीरामाच्या संतुष्टीसाठी प्रयत्न करीत असतात. येथे कोणी स्वतः सुखी होण्याचा प्रयत्न करत नाही. श्रीरामांच्या सुखातच प्रत्येकाला आपोआपच सुख प्राप्त होते. सद्य परिस्थितीत म्हणजे कलियुगात आपण इंद्रियांना सुख देण्याचा प्रयत्न करतो आहोत पण परिणामी आपल्याला दु:खच प्राप्त होते. कारण आपली इंद्रिये कधीच संतुष्ट होत नाहीत. याला भगवद्गीतेमध्ये ‘काम’ म्हटले आहे. हा काम एखाद्या अग्नीप्रमाणे आहे. अग्नीत जर तेल ओतले तर अग्नी भडकताच राहील, तो कधीही शांत होणार नाही. त्याचप्रमाणे आपली इंद्रियेसुद्धा कामाने भडकलेल्या अग्नीप्रमाणे आहेत, इंद्रियांना कितीही संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी ती संतुष्ट होत नाहीत. म्हणून कलियुगामध्ये लोक कायम त्रस्त, अशांत, भांडखोर आणि अतृप्त आहेत. यासाठी असे म्हटले जाते की जिथे ‘काम’ आहे तिथे ‘राम’ नाही आणि जिथे ‘राम’ आहे तिथे ‘काम’ वास्तव्य करू शकत नाही.
रामराज्यामध्ये प्रत्येकाच्या मुखात नित्य रामनामाचा जप सुरू असतो. आपल्याला आठवत असेल ‘गुड मॉर्निंग’ संस्कृती ब्रिटिशांनी आणली पण आपले पूर्वज ‘राम राम’ अथवा ‘राम कृष्ण हरी’ असे म्हणून एकमेकांचे स्वागत करत असत. मला आठवते लहानपणी आमच्या घरी पत्र घेऊन येणारा पोस्टमन प्रत्येक पत्र घरामध्ये टाकताना ‘राम कृष्ण हरी, माउली’ म्हणून पत्र टाकत असे. घरामध्ये, शेतामध्ये काम करीत असताना सर्वजण रामकृष्णावर आधारित अभंग ओव्या गात असत. सकाळच्या प्रहरी आमच्या आजीने जात्यावर दळताना गायिलेल्या ओव्या आजही माझ्या कानात घुमतात, एकमेकांना प्रेरित करण्यासाठी श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या कथांचे वर्णन केले जायचे. दुर्दैवाने या सर्व संस्कृतीची जागा आज टीव्ही मालिकांनी घेतली आहे. याचा परिणाम म्हणून चारित्र्याची जडणघडण आजच्या पिढीमध्ये दिसत नाही. इतिहासातील ज्या ज्या चारित्र्यवान व्यक्तींची चरित्रे आपण पाहतो त्यांना सर्वाना श्रीराम व श्रीकृष्ण यांच्याकडूनच प्रेरणा मिळाली आहे. याचे सर्वात प्रमुख उदाहरण म्हणजे छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या आदर्श मातोश्री जिजाऊंनी महाराजांच्या लहानपणी रामायण, महाभारत, भागवत यासारख्या ग्रंथातून ज्ञान देऊनच महाराजांचे चरित्र घडविले. म्हणूनच महाराजांनी ‘रामराज्य’ आणले. आज आपण छत्रपती शिवाजीमहाराजांचा अभिमानाने गौरव करतो पण त्यांच्यासारखे महाभारत रामायण भागवतमधून प्रेरणा घेऊन स्वतःच्या मुलामुलींचे चरित्र घडविण्याचा प्रयत्नदेखील करत नाही.
आज आपल्याला ‘रामराज्य’ हवे आहे पण ‘राम’ नको आहे. आपल्याला ‘राम’ हवा असेल तर सर्वप्रथम श्रीरामाशी आपला असलेला नित्य संबंध पुनर्स्थापित करावयास हवा. त्यासाठी रामनामाचा जप करणे अत्यंत आवश्यक आहे. रामनामाच्या जपाने आपली ‘कामभावना’ नष्ट होऊन ‘रामभावना’ जागृत होते. असे केल्याने जेव्हा पूर्णपणे पापरहित जीवन जगून श्रीरामाच्या सेवेत सीता, लक्ष्मण, हनुमान, भरत सारखे पूर्णपणे समर्पित होऊ तेव्हाच ‘रामराज्य’ शक्मय आहे.
रामराज्यामध्ये प्रत्येकजण धर्माचे पालन करतो. धर्म याचा अर्थ भगवंतावर प्रेम करणे, त्यांची निस्वार्थ सेवा करणे, त्यांच्या आदेशाचे पालन करून जीवन व चरित्र शुद्ध बनविणे. आपले जीवन व चरित्र शुद्ध व्हावे अशी इच्छा करणाऱयांनी स्वतःला पापवृत्तीपासून दूर ठेवले पाहिजे. कारण पापकर्मे आपल्याला ‘राम’ पासून दूर ठेवतात. श्रीमद् भागवतमध्ये कलियुगामध्ये चार पाप कृत्यांपासून सर्वाना दूर राहण्यास सांगितले आहे. द्यूतं पानं स्त्रिय: सूना यत्राधर्मश्चतुर्विध: अर्थात जुगार, नशापान, अवैध स्त्रीपुरुष संबंध आणि मांसाहार हा ती चार पापकर्मे आहेत. कारण जुगारामुळे सत्यता नष्ट होते, नशापानामुळे तपस्या नष्ट होते, अवैध स्त्रीपुरुष संगामुळे शारीरिक आणि मानसिक शुद्धता नष्ट होते आणि मांसाहारामुळे अहिंसा नष्ट होते. आपल्याला प्रामाणिकपणे आणि खरेच जर ‘रामराज्य’ आणावयाचे असेल तर या चार पापकर्मापासून दूर राहून श्रीरामनामाचा नित्यनियमाने जप केला पाहिजे. प्रत्येक नागरिकाने ही जबाबदारी स्वीकारल्यास सर्वाना अपेक्षित ‘रामराज्य’ यायला वेळ लागणार नाही.
वृंदावनदास