●जिल्हा रुग्णालयावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
●नगरसेवक शेखर मोरे-पाटील, विशाल जाधव झाले आक्रमक
●प्रशासनास कळवून घेतले नव्हते गंभीरपणे
प्रतिनिधी/सातारा
गोडोली येथील 60 वर्षीय महिलेचा किडनीचा आजार होता. सहा महिन्यांपासून त्या डायलिसिस करत होत्या. एका खासगी रुग्णालयात त्यांनी डायलिसिस करण्यासाठी गेल्या तत्पूर्वी तेथे तपासणी केली. तेथेच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. उपचारासाठी त्या जिल्हा रुग्णालयात होत्या. जिल्हा रुग्णालयात डायलिसिस सोय असून कोरोना असल्याने त्यांचे डायलिसिस करण्यात आले नसल्यानेच त्यांचा काल मृत्यू झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. जिल्हा रुग्णालयावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी नगरसेवक शेखर मोरे-पाटील आणि नगरसेवक विशाल जाधव हे आक्रमक झाले आहेत.
याबाबत माहिती अशी की, गोडोली येथील 60 वर्षाची महिला ही किडनीच्या दुर्धर आजाराने गेल्या सहा महिन्यांपासून आजारी आहेत. त्यांना डायलिसिस करावे लागत होते. काही दिवसाच्या कालावधीनंतर पुन्हा डायलिसिस करावे लागायचे. गेल्या चार महिन्यापासून कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव पाहता जिल्हा रुग्णालयात डायलिसिस सुविधा असून ही कोरोनाच्या भीतीपोटी त्या जात नव्हत्या.एका खासगी हॉस्पिटलमध्ये डायलिसिस करण्यासाठी काही दिवसांपूर्वी गेल्या.तत्पूर्वी काही तपासण्या कराव्या लागतात असे सांगितले होते त्या कारणास्तव रुग्णालयात जाण्यायेण्यामुळे तपासणी दरम्यान कोरोना असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाच्या उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. नातेवाईक रुग्णालय प्रशासनाला कित्येकदा त्यांना डायलिसिस गरज आहे असे सांगत होते. तसेच नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांनी प्रशासनास त्यांच्या आजाराची कल्पना दिली होती. तर नगरसेवक विशाल जाधव यांनी जिल्हा रुग्णालयात कोरोना झालेल्या पण डायलिसिसच्या रुग्णाला एक मशीन उपलब्ध करावी अशी मागणी केली होती. मात्र, जिल्हा रुग्णालय प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. अखेर त्या महिलेचा काल सायंकाळी उशिरा मृत्यू झाला.
जिल्हा रुग्णालय प्रशासनच त्यांच्या मृत्यूस जबाबदार आहे. त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नगरसेवक शेखर मोरे-पाटील, विशाल जाधव यांनी केली आहे.