वृत्तसंस्था/ साऊदम्पटन
शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या तिसऱया आणि शेवटच्या कसोटीत यजमान इंग्लंडच्या पहिल्या डावाला डळमळीत सुरवात झाली. पाकच्या गोलंदाजानी इंग्लंडच्या फलंदाजावर चांगलेच दडपण ठेवले. शेवटची बातमी हाती आली त्यावेळी इंग्लंडची स्थिती पहिल्या डावात 4 बाद 129 अशी होती.
तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत इंग्लंडने पाकवर 1-0 अशी आघाडी यापूर्वीच मिळविली आहे. या शेवटच्या कसोटीत प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने उपाहारापर्यंत 2 बाद 91 धावा जमविल्या होत्या. इंग्लंडच्या क्रॉलेने अर्धशतक झळकविले. इंग्लंडच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. पाचव्या षटकात पाकच्या शाहीन आफ्रिदीने इंग्लंडच्या सलामीच्या बर्न्सला सहा धावावर झेलबाद केले. त्यानंतर सिबली आणि क्रॉले यांनी दुसऱया गडय़ासाठी 61 धावांची भागिदारी केली. पाकच्या यासिर शहाने सिबलीला 22 धावावर पायचित केले. उपाहारापूर्वीच क्रॉलेने आपले अर्धशतक पूर्ण केले. खेळाच्या पहिल्या सत्राअखेर क्रॉले 53 तर कर्णधार रूट 10 धावांवर खेळत होते.
खेळाच्या दुसऱया सत्राला प्रारंभ झाल्यानंतर इंग्लंडने आणखी दोन फलंदाज गमविले. नसिम शहाने कर्णधार रूटला 29 धावावर झेलबाद केले. त्यानंतर यासिर शहाने पोपचा 3 धावावर त्रिफळा उडविला. 40.4 षटकाअखेर इंग्लंडने 4 बाद 129 धावा जमविल्या होत्या. यावेळी क्रॉले 69 धावावर खेळत होता.
धावफलक
इंग्लंड प डाव – 40.4 षटकाअखेर 4 बाद 129 (क्रॉले खेळत आहे 69 बर्न्स 6, सिबली 22, रूट 29, पोप 3, यासिर शहा 2-37, नसिम शहा 1-45, शाहिन आफ्रिदी 1-24.)









