निवडणूक आयोगाकडून घोषणा, बिहारमध्ये विधानसभा निवडणूक वेळेवर होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनासारख्या साथींच्या काळात निवडणूक कशा प्रकारे घ्यावी यासंबंधातील नव्या दिशानिर्देशांची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. त्यानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान यंत्राचे बटन दाबण्यासाठी मतदारासाठी डिस्पोझेबल हातमोज्यांची सोय करण्यात येणार आहे. मतदानाच्या शेवटच्या तासात विलगीकरणातील रूग्णांनी मतदान करावयाचे आहे. कोरोना विषाणूंची बाधा झालेल्या रूग्णांना आणि 80 वर्षांवरील वृद्धांना पोस्टाद्वारे मतदान करता येईल.
हे नवे दिशानिर्देश आयोगाने घोषित केल्याने कोरोनाकाळातच राज्यविधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुका आणि राज्यसभा, विधानपरिषद आणि पोटनिवडणुकाही होणार असल्याचे स्पष्ट झाले. कोरोना उद्रेकातील प्रथम मोठी निवडणूक ही बिहार विधानसभेसाठी होणार असून ती नोव्हेंबरमध्ये होईल. या निवडणुकीची अधिसूचना 20 सप्टेंबरच्या आसपास करण्यात येईल.
प्रचारकार्यासाठीही दिशानिर्देश
नव्या नियमांची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी केली. या नियमांची यांनी सविस्तर माहिती दिली. निवडणुकीचा प्रचार कसा करावा, यासंबंधीचे दिशानिर्देशही घोषित करण्यात आले आहेत. त्यानुसार कोरोनाच्या नियमांचे पालन करूनच जाहीर सभा घेता येणार आहेत. रोडशोच्या वेळी प्रत्येक पाच वाहनांनंतर अंतर ठेवावे लागणार आहे. तसेच एका उमेदवाराच्या केवळ पाच जणांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा देण्यात येणार आहे.
हातस्वच्छता अनिवार्य
प्रत्येक मतदानकेंद्रावर हातस्वच्छतेसाठी सॅनिटायझर्सची सोय असेल. सर्व मतदान केंद्रांची स्वच्छता अनिवार्यपणे केली जाईल. मतदानाच्या आधी एक दिवस ही स्वच्छता होईल. नंतर केंद्र मतदानाच्या वेळेपर्यंत बंद ठेवण्यात येईल. प्रत्येक मतदानकेंद्राच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर औष्णिक तापमान मापनाची (थर्मल स्क्रीनींग) सोय उपलब्ध केली जाईल. मतदान केंद्राचे कर्मचारीं किंवा अर्धवैद्यकीय कर्मचारी औष्णिक चाचणी करतील, अशी माहिती त्यांनी दिली.
पोस्टल मतदानाची व्याप्ती वाढणार
पोस्टाद्वारे मतदानाची सोय आता 80 वर्षांपुढील वयाच्या नागरीकांना आणि कोरोनाबाधित रूग्णांना देण्यात येणार आहे. 80 वर्षांपुढील व्यक्तींना कोणत्याही प्रकारे कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी ही योजना करण्यात आल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. कोरोना रूग्णांनाही मतदानापासून वंचित रहावे लागणार नाही.
जाहींर सभांसाठी विशेष नियमावली
जाहीर सभांसाठी विशिष्ट मैदाने अगर मोकळय़ा जागा आधीच निश्चित करण्याचे उत्तरदायित्व जिल्हा निवडणूक अधिकाऱयांवर देण्यात आले आहे. त्यांनी या मैदानांचे प्रवेश मार्ग आणि निर्गमन मार्ग आधी स्पष्टपणे सुनिश्चित करावयाचे आहेत. लोकांना बसण्यासाठी ठराविक अंतरावर खुणा करून ठेवणेही अनिर्वाय करण्यात आले आहे. सभास्थानी सामाजिक अंतराचा नियम लागू होणार आहे. तसेच प्रेक्षकांची संख्याही मर्यादित केली जाणार असून हे उत्तरदायित्व जिल्हा निवडणूक अधिकारी आणि आपत्तीनिवारण अधिकारी यांचे आहे.
उमेदवारी अर्ज ऑनलाईन
यावेळी प्रथमच उमेदवारी अर्ज ऑन लाईन सादर करता येणार आहे. तसेच अनामत रक्कमही ऑनलाईन भरता येणार आहे. निवडणुकीसंबंधीच्या प्रत्येक कामाकरिता मुखावरण (मास्क) उपयोगात आणणे बंधनकारक आहे.
काय सांगतात नवे नियम…
मतदान केंद्रावरील सुरक्षा

प्रत्येक मतदान केंद्राची एक दिवस आधी पूर्ण स्वच्छता
प्रत्येक मतदाराला मतदानासाठी डिस्पोझेबल हातमोजे
प्रत्येक मतदान केंद्रात जास्तीत जास्त 1000 मतदार
मतदान करताना सामाजिक अंतराचा नियम अनिवार्य
प्रचारसभांचे नियम
प्रचारसभांसाठी मैदाने आधीच सुनिश्चित केली जाणार
प्रत्येक मैदानाचे प्रवेश आणि निर्गमन मार्ग रेखांकित होणार
सामाजिक अंतर राखण्यासाठी मैदानावर खुणा केल्या जाणार
खुणांच्या जागीच प्रेक्षकांनी बसणे अनिवार्य पेले जाणार
सभेला येणाऱया प्रेक्षकांची संख्या मर्यादित करण्याचा नियम
या नियमांचे पालन करण्याचे उत्तरदायित्व जिल्हाधिकाऱयांवर









