आपला पुत्र भौमासुराला भगवंताच्या हस्ते मरण येणार हे कळल्यावर भूमिदेवीने भगवंताला प्रार्थना केली त्याला मारू नये. त्यामुळे भगवंताने त्याला काही काळ अभय दिले. त्यानंतर भगवान सत्यभामेच्या मंदिरी असताना इंद्राने भगवंतापाशी येऊन भौमासुराच्या उद्दामपणाबद्दल आणि त्याने चालवलेल्या आक्रमण व लुटीबाबत देवाला सविस्तर सांगितले व त्याचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. सत्यभामा ही प्रत्यक्ष भूमिदेवीचा अंश असल्याने भगवान तिलाच सोबत घेऊन भौमासुराचा बंदोबस्त करायला गेले असा संकेत वराह पुराणात दिला आहे. श्रीकृष्ण सत्यभामेसह गरुडावर स्वार होऊन भौमासुराची राजधानी प्राग्ज्योतिषपूर येथे गेले.
परम दुर्गम उत्तुंग गिरि । दुर्घट दुर्ग तया उपरि ।
उत्तरोत्तर सहस्रवरी । दुर्गान्तरिं प्रतिदुर्गें ।
तदंतरिं शस्त्रदुर्गें । दुर्घट दुर्गमें अभंगें ।
कृतान्तदशनासम निलागें । प्राग्ज्योतिषपुरवप्री।
प्रतिदुर्गाश्रित परिखारूप । अगाध अक्षोभे भंवतें आप ।
मकर नक्र काळसर्प । ग्रह अमूप जळगर्भीं ।
तदंतःपाती वज्रपर्वत । चंड कठोर परमोच्छ्रित ।
त्यावरी अग्निदुर्ग अद्भुत । ज्वाळा उसळत नभोगर्भीं । तदूर्ध्व नियमित पवनपरिधि । अग्निदुर्गातें प्रबोधी ।
गगनीं खगगणा चालतां रोधी । असाध्य समृद्धि असुरांची ।
मुरदैत्याच्या पाशश्रेणी । अभिचारदेवतामंत्रपठनीं ।
शिक्षिता नियमित गगनीं धरणी । पुर वेष्टनि ति÷ती ।
ऐसें दुर्गमा दुर्गमतर । निर्मनि प्राग्ज्योतिषपुर ।
प्रतापें नांदे भौमासुर । सशक्र निर्जर त्रासूनी ।
प्राग्ज्योतिषपूरात प्रवेश करणे अत्यंत कठीण होते. तेथे चारी बाजूंनी डोंगरांची रांग होती, त्याच्या आत शस्त्रे लावून ठेवली होती, त्याच्या आत पाण्याने भरलेले खंदक होते, त्याच्या आत अग्नी पेटवलेले खंदक होते आणि त्याच्याही आतल्या बाजूला प्रचंड वारा वाहणारा तट होता. त्याच्यापुढे मूर नावाच्या दैत्याने नगराच्या चारी बाजूंना दहा हजार भयंकर आणि घट्ट असे फास लावून ठेवले होते.
वज्रघातें जैसा वज्री । पर्वत भंगी प्रचण्डप्रहारिं ।
तेंवि गुर्वी गदा घेऊनि करिं । भंगी श्रीहरि गिरिदुर्गें ।
दुर्गम पर्वत उत्तरोत्तर । प्राग्ज्योतिषपुरप्राकार ।
भंगिता जाला गदाधर । गदाप्रहारिं ते अवघे ।
पुढें अवघड शस्त्रदुर्गें । शार्ङ्ग सज्जूनि कमलारंगें । धनुर्विद्येच्या अमोघमार्गें । बाणीं अवेगें भंगिलीं ।
श्रीकृष्णाचे अमोघ बाण । कृतान्ताचे घेती प्राण ।
तेथ कायसी आंगवण । शस्त्रावरणविखण्डनीं ।
सांदीपनिप्रसादलब्ध । ते ते जपोनि प्रयोग सिद्ध ।
शरौघ वर्षोनियां अगाध । केला उच्छेद शस्त्रदुर्गा ।
पुढें कृत्यानिर्मित अग्नि । शतयोजनें धडके गगनीं ।
सहस्रारचपे करूनी । चक्रपाणि त्या भंगी ।
दुर्वासाची जेंवि जटा । संक्षुब्धप्रळयहव्यवाटा ।
अम्बरीषाच्या भरितां घोटा । तेणें वैकुण्ठा आठविलें । तैं सुदर्शन प्रेरी हरि । जटाकृत्याग्नि तिरोहित करी ।
दुर्वासातें पाडिलें फेरिं । त्रिजगीं भवरी देवविली । त्याहूनि सहस्रधा प्रदीप्त । सुदर्शनाग्नि धगधगीत ।
देखूनि लोपलें कृत्याकृत्य । अग्नि समस्त हारपला ।
सुदर्शनाग्निप्रळयकोप । तेणें शोषिलें समस्त आप ।
देखोनि ज्वाळांचा प्रताप । पवन सन्ताप पावला ।








