पेडणे / प्रतिनिधी
चांदेल पाणी पुरवठा प्रकल्पाच्या वझरी येथे पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया जाते. दिवसभ पाण्याचे उंच कारंजे उडत राहिले. त्यामुळे लोकांचे मनोरंजन झाले. मात्र कर्मचाऱयांचे दुर्लक्ष झाल्याने वझरी येथील लोकांची पाण्यासाठी वणवण झाली.
पावसाळय़ात देखील चांदेल पाणी पुरवठा प्रकल्पाच्या कर्मचाऱयांच्या हलगर्जीपणामुळे लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. आज सकाळी चांदेल पाणी प्रकल्पाच्या वझरी येथे पाणी पुरवठा करणाऱया मुख्य जलवाहिनीच्या चेंबरला गळती लागून आज दिवसभर लाखो लिटर पाणी विनाकारण वाया गेले. पाणी जोरात असल्याने सुमारे वीशेक मीटर उंच पाण्याचे कारंजे उडत होते. त्यामुळे शेजारच्या रस्त्याने येणाऱया – जाणाऱया लोकांचे मात्र मनोरंजन झाले. कर्मचाऱयांच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी विना कारण वाया गेले. त्यामुळे वझरी गावात नळाला कमी दाबाने पाणी पुरवठा झाला. बाहेर धो धो पाऊस पडत असताना वझरी येथे घरातील नळ मात्र कोरडे पडले होते. चतुर्थीचा सण दोन दिवसांवर आला असून पाणी पुरवठा खंडित झाल्यास महिलांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. संबंधीत अधिकार्यांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आहे.