फेरीवाल्यांची सोपोकर कमी करण्याची मागणी
प्रतिनिधी / फोंडा
कोरोना महामारीच्या संकटात सामाजिक अंतर राखून फोंडा येथील बुधवारपेठ बाजार परीसरात भरविण्यात आलेल्या माटोळी बाजाराला ग्राहकाकडून अल्प प्रतिसाद लाभला. यंदा ग्राहकांची आवक कमी असल्याने व्यापाऱयाना फटका बसत असून फोंडा पालीकेतर्फे सोपो करातही वाढ करण्यात आल्यामुळे दुहेरी फटका फेरीवाल्यांना बसत आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा बाजार ऐअरपोर्ट रोडच्या खुल्या जागेवर भरविण्यात येणार असल्याचे संकेत होते मात्र ते फोल ठरले असून मार्केट प्रकल्पाच्या समोर रस्त्याच्या बाजूला बहुतेकांची माटोळी बाजार थाटलेला आहे. बागायतदार बाजार परीसरात ते सुपर मार्केट परीसरपर्यंत बसणाऱया फेरीवाल्यांना सोपोकरात कपात करावी अशी मागणी काही विक्रेत्यांनी केली आहे. यासंदर्भात पालीका मुख्याधिकारी यांनी सदर दर रास्त असल्याची भूमिका घेतली आहे. माटोळी व्यापाऱयांना दिवसाकाठी रू. 100 ची पावती तर काही फेरीवाले रेडीमेड गारमेन्टस् विक्रेत्यांना प्रति दिवस रू. 600 ची पावती फाडण्यात आल्याचे प्रकार दिसून आले. यंदा कोरोना महामारीमुळे ग्राहक भेटत नाही त्यात सोपोकराचा भुर्दड अशी अवस्था फेरीवाल्यांची झालेली आहे. यंदा माटोळी बाजाराला तेजी नसल्याचे काही व्यापाऱयांचे म्हणणे आहे. बेतोडा, निरंकाल, केरी, सावईवेरे या भागातून रानटी साहित्य अजून पोचलेले नाही. पोफळीचे कातरे,कांगला अल्प प्रमाणात उपलब्ध असून संततदार पावसामुळे नारळाची पेंणीचा तुटवढा भासत आहे. आज उद्या दोन दिवस शिल्लक असून मोठया प्रमाणात व्यापारी बाजाराला येण्याची शक्यता कमीच आहे. महामार्गावर माटोळी साहित्याची विक्री करणे असा सायीस्कर मार्ग काही व्यापाऱयांनी कोरोना महामारीत निवडलेला आहे.