ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल, अशी खात्री असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले, मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय मार्फत 2014 मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा असा निकाल दिला आहे. तसेच मुंबई पोलिसांनी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याचे आदेश ही दिले आहेत. तसेच गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांना दिले आहेत. महाराष्ट्र सरकारनेही निकालाचे पालन करावे, असेही न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे.