सणाच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी
प्रतिनिधी/ बेळगाव
परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. यामुळे महामारीचे संकट असले तरी त्यातूनही मार्ग काढत परंपरेनुसार गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बेळगावनगरी सज्ज झाली आहे. पावसाच्या संततधारेमुळे मागील चार दिवसांपासून गणेशोत्सवाची बाजारपेठ थंडच होती. मात्र, बुधवारी पावसाची विश्ा़खांती बाप्पाच्या खरेदीचा मुहूर्त साधणारी ठरली. यंदा गणेशाचा आगमन सोहळा कोविड-19 मुळे साधेपणाने व आखून दिलेल्या नियमात पार पडणार आहे. मात्र सजावट, आरास तसेच इतर साहित्यांची खरेदीसाठी बाजारपेठ फुल्ल झाल्याचे दिसून आले. यामुळे साहित्यांचे प्रदर्शन मांडून बसलेल्या व्यापाऱयांसाठी बुधवारचा दिवस विघ्नहर्ता बाप्पाच्या कृपाशीर्वादाने आर्थिकदृष्टय़ा फायद्याचा ठरला.
गणेश चतुर्थीचा सण 22 ऑगस्ट रोजी आहे. दरवर्षी बेळगावचा गणेशोत्सव दिमाखात साजरा होतो. नवीन कपडे खरेदीपासून बाप्पाच्या सजावटीच्या निमित्ताने केला जाणारा खरेदीचा थाट काही न्याराच असतो. यामुळेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिवसभर बाजारपेठेत गर्दी झाली होती. नानाविध साहित्य खरेदीसाठी बेळगावकर बाजारात आल्याचे दिसून आले. पावसाने विश्रांती घेतल्याने खरेदीला दिवसभर जोर आला होता. शहरातील नागरिकांबरोबरच बेळगाव ग्रामीण भागातील नागरिकांनीदेखील बाजारात हजेरी लावल्याचे दिसून आले. यामुळे सणासुदीच्या निमित्ताने केल्या जाणाऱया गोडधोड पक्वान्नासाठी किराणा मालाची दुकाने, बाप्पाच्या सजावटीसाठी डेकोरेशनची दुकाने, वस्त्र दालने बहरल्याचे दिसून आले.
खऱया अर्थाने गणेशोत्सवाची चाहुल
महामारीचा विळखा घट्ट होण्याबरोबरच नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडल्याने बाजारपेठ थंडच असल्याचा अनुभव येत होता. मात्र, बुधवारी खऱया अर्थाने बेळगावनगरीला गणेशोत्सवाची चाहुल लागल्याचा अनुभव आला. गणपत गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, बुरुड गल्ली तसेच रविवार पेठ या भागात सणाच्या निमित्ताने आवश्यक साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी, दुकानांमध्ये झालेली गर्दी यामुळे सामाजिक अंतराचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले. मात्र तोंडाला मास्क आणि आपली सुरक्षितता आपल्या हातात अशा विश्वासाने बेळगावकरांनी गणेशोत्सवाच्या खरेदीला सुरुवात केली असल्याचे चित्र पहायला मिळाले.









