नियतीचा फेरा पाठ सोडेना : आवाडे येथील निराधार वृद्धेवर अतिवृष्टीने मोठे संकट
तेजस देसाई / दोडामार्ग:
नियती किंवा परिस्थिती म्हणा, अशी काही परीक्षा घेते की, एखादी व्यक्ती पुरती हादरून जाते. पण, या परिस्थितीला तोंड देत संकटाचा सामना करत काही व्यक्ती आनंदी जगत असतात. पण, नियतीचा फेरा कधी कधी काही केल्या पाठ सोडत नाही. अशाच कठीण प्रसंगाला तालुक्यातील आवाडे येथील लीलावती शांताराम नाईक या 65 वर्षीय वृद्धा सध्या सामोरे जात आहेत.
दोन दिवसांपूर्वीच झालेल्या अतिवृष्टीने निराधार असणाऱया या वृद्धेच्या घराचेही छत्र हिरावून घेतले. कवी कुसुमाग्रजांच्या प्रसिद्ध कवितेतील ‘भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले’ या ओळी वाचताना किंबहुना त्याहून कित्येक पट जास्त वेदना या माऊलीच्या घराची झालेली पडझड आणि परिस्थिती पाहिल्यावर होतात. या आजीला घराच्या चार भिंती व छप्पर उभारून जगण्यासाठी धीर देणेच यावेळी समाजाच्या हाती आहे.
गेल्या चार दिवसांपासून दोडामार्ग तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. शेती-बागायतींचे मोठे नुकसान झाले आहे. गतवर्षी तर पावसाने अक्षरशः कहर केला होता. अनेक घरे पाण्याखाली गेली होती. यावर्षी त्या प्रमाणात हानी झाली नसली, तरी आवाडे येथील निराधार वृद्धेच्या डोळय़ात मात्र पाणी आणले आहे. लीलावती यांचे कुटुंब सुरुवातीपासूनच संकटांचा सामना करीत आले आहे. लीलावती व त्यांच्या पतीने मातीचे घर बांधले. मध्यंतरी पतीच्या मृत्यूने लीलावती एकाकी पडल्या. मजुरी करून त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. जी निराधार पेन्शन मिळते, त्यात कशीबशी गुजराण सुरू आहे. संकटांचा सामना करीत असताना एवढय़ा थकल्या आहेत की त्यांचा चेहराच बरंच काही सांगून जातो. अशातच दोन दिवसांपूर्वीच्या पावसात त्यांच्या घराच्या पाठीमागचा भाग कोसळला. त्यामुळे घराचा पूर्ण डोलारा संभाळणारे छत हलले आहे. या घरातून बाहेर पडण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. पण, राहायचे कुठे? हा प्रश्न आहे. अधिक वेदना म्हणजे त्या पायाने अपंगही आहेत.
मला केवळ राहण्याची जागा मिळेल का?
लीलावती डोळय़ात पाणी आणून सांगतात, ‘माझं मी करून खाईन. फक्त मला राहण्यापुरता आसरा करून द्या.’ प्रस्तुत प्रतिनिधीने गावकरी व नातेवाईक यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले, समाजातील दानशूरांकडून मदत झाल्यास आम्ही आमच्याकडूनही घर उभारण्यासाठी लागणारे कष्टाचे काम करू. त्यामुळे या आजीला घर उभारून देण्यासाठी तूर्त तरी दात्यांकडून मदतीची गरज आहे. त्यासाठी बँक ऑफ इंडिया साटेली-भेडशी लीलावती शांताराम नाईक खाते क्रमांक 142410110001664 व आयएफसी कोड बीकेआयडी0001424 आहे. तसेच अधिक महितीसाठी सरपंच विनायक शेटये (9423811295) यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.









