ऑनलाईन टीम / मुंबई :
माजी खासदार आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली असून त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. स्वतः किरीट सोमय्या यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.

ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दहा दिवसांच्या उपचारानंतर आम्ही कोरोनावर मात केली आहे. डॉ. राहुल पंडीत आणि त्यांच्या टीमकडून करण्यात आलेल्या उपचारानंतर मी आणि माझी पत्नी मेधा घरी आलो आहोत.
कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आणि सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी पुन्हा सज्ज झालोय, असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, किरीट सोमय्या आणि त्यांची पत्नी डॉ. मेधा सोमय्या यांना 10 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी स्वत: याबाबत ट्विट करत माहिती दिली होती.









