साल्वादोर दु मुंदूचे सरपंच साळगावकर यांचे आवाहन
प्रतिनिधी / पर्वरी
कोरोना महामारीमुळे सर्व धार्मिक उत्सवावर मर्यादा आल्या आहेत. गणेश चतुर्थी उत्सव 22 ऑगस्ट रोजी साजरा होत असून या अनुषंगाने साल्वादोर दु मुंदू पंचायत क्षेत्रातील नागरिकांनी दीड दिवशीय गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन सरपंच संदीप साळगावकर यांनी केले आहे.
गोव्या गणेश चतुर्थी उत्सव दरवर्षी मोठय़ा उत्साहाने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा होत असतो. मात्र यावर्षी मार्च 20 पासून कोरोना महामारी सुरु झाल्याने या उत्सवावर मोठा परिणाम झाला आहे. याचप्रमाणे गणेश चतुर्थी साजरी करताना प्रदूषण टाळण्यासाठी फटाके व दारुकामाची आतषबाजी करण्याचे टाळावे, असे सरपंच साळगावकर यांनी सांगितले.
पंचायत क्षेत्रातील तोर्ड, धनवाडा, किटला, आल्त तोर्ड भागातील लोकांनी दीड दिवशीय गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.









