जि. प. आठ दिवसांसाठी बंद? : शिक्षण विभाग सील : जिल्हय़ात आणखी 22 पॉझिटिव्ह
- महत्वाच्या कामाशिवाय जि. प. मध्ये येणे टाळावे – समिधा नाईक
- संशयित सर्व कर्मचाऱयांची कोविड तपासणी करा – जिल्हाधिकारी
- जिल्हय़ात 33 जणांना डिस्चार्ज, एकूण 449 जण कोरोना मुक्त
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे कर्मचारीवर्गात खळबळ उडाली आहे. शिक्षण विभागाच्या तीन कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली असून त्यामुळे शिक्षण विभाग सील करण्यात आला आहे. याची दखल घेत जि. प. अध्यक्ष समिधा नाईक यांनी महत्वाच्या कामाशिवाय जि. प. मध्ये कोणी येऊ नये, असे आवाहन केले आहे. तर संशयित सर्व कर्मचाऱयांची कोविड टेस्ट करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जि. प. प्रशासनाला दिल्या आहेत. दरम्यान जिल्हय़ात आणखी 22 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर 33 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जि. प. मध्ये 9 व 10 ऑगस्टला समुपदेशन पद्धतीने शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यावेळी 9 तारीखला समुपदेशनासाठी आलेले आंबोली येथून आलेला एक शिक्षक पॉझिटिव्ह आल्याचे त्याच रात्री समजले होते. त्यानंतर त्या शिक्षकाच्या अतिजोखमीच्या संपर्कात आलेल्या 19 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये शिक्षण विभागातील एक महिला लिपिक कर्मचारी आणि दोन शिपाई पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जि. प. भवनामध्ये खळबळ उडाली आहे.
शिक्षण विभाग केला बंद
शिक्षण विभागातील तीन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी तात्काळ शिक्षण विभाग सात दिवसांसाठी बंद केला आहे. तसेच निर्जंतुकीकरणही करण्यात येणार आहे. तर पॉझिटिव्ह आलेल्या तीन कर्मचाऱयांच्या संपर्कात किती व्यक्ती आल्या, याचा शोध घेणे सुरू केले आहे.
आवश्यकता भासल्यास आठ दिवसांसाठी जि. प. बंद
जि. प. चे तीन कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके आणि इतर पदाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. नागरिकांनी महत्वाच्या कामाशिवाय येणे टाळावे. किमान आठ दिवस तरी जि. प. मध्ये कुणी येऊ नये, असे आवाहन करण्यात आले. तसेच संपूर्ण जि. प. चे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. ज्या कर्मचाऱयांना कोरोनाची लक्षणे आहेत, संशयित आहेत, अशा कर्मचाऱयांना स्वॅब देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये जर आणखी काही कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले, तर जिल्हा परिषद आठ दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेऊ, असे जि. प. अध्यक्षा समिधा नाईक यांनी स्पष्ट केले. कर्मचाऱयांनी घाबरून न जाता लक्षणे दिसल्यास स्वतःहून स्वॅब देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
संशयित सर्व कर्मचाऱयांची तपासणी करा – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनीही दखल घेत कोरोनाची लक्षणे दिसणाऱया सर्व कर्मचाऱयांची कोरोना तपासणी करून घ्यावी, अशा सूचना जि. प. प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच अजून काही कर्मचारी पॉझिटिव्ह मिळाल्यास काही दिवसांसाठी जिल्हा परिषद बंद ठेवण्याबाबतही विचार करावा, अशा सूचना दिल्या आहेत.
जि. प. बंद करण्याची कर्मचारी संघटनेची मागणी
जि. प. मध्ये तीन कर्मचारी कोरोना बाधित आढळल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद आठ दिवसांसाठी बंद ठेवावी, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्य चिटणीस आकाश तांबे, जिल्हाध्यक्ष संदीप कदम, मुख्यालयाचे अध्यक्ष मधुकर राठोड, प्राथमिक शिक्षक संघटनेचे किशोर कदम यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन केली. जिल्हाधिकाऱयांनीही याबाबत दखल घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
रेवतळे, देऊळवाडा, गवंडीवाडा येथे कंटेनमेंट झोन
मालवण तालुक्मयातील रेवतळे येथे घर क्र. 2276 चा परिसर, देऊळवाडा येथील घर क्र. 2816 चा परिसर, गवंडीवाडा येथील घर क्र. 690 अ चा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. रेवतळे व देऊळवाडा कंटेनमेंट झोनमध्ये 27 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत व गवंडीवाडा या कंटेनमेंट झोनमध्ये 28 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री बंद राहणार आहे.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 9786
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 658
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 8944
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 184
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 197
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 12
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 449
अलगीकरणातील एकूण व्यक्ती 24048
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 4068
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 198509
सद्यस्थितीत सक्रिय कंटेनमेंट झोन 65
जिल्हय़ात आणखी 22 पॉझिटिव्ह
जिल्हय़ात सोमवारी आणखी 22 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची एकूण 658 झाली आहे. तसेच सोमवारी आणखी 33 रुग्णांना एकाच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत 449 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कोरोना सक्रिय रुग्ण 197 आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली. जिल्हय़ात नव्याने सापडलेल्या 22 रुग्णांमध्ये ओरोस सहा, माडखोल, माणगाव, मळगाव, दोडामार्ग, भिरवंडे, सावंतवाडी, कलमठ, देवगड-कॉलेजरोड या ठिकाणी प्रत्येकी एक, कणकवली दोन, देवगड तीन, मालवण-देऊळवाडा तीन असे रुग्ण आढळले आहेत.









