प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक राज्य सरकारने भू सुधारणा दुरुस्ती कायदा अंमलात आणण्याचा विचार सुरू केला आहे. हा कायदा शेतकऱयांना देशोधडीला लावणारा आहे. यामुळे शेतकरी पुढील काळात भूमीहीन होणार असून हा कायदा त्वरित रद्द करावा, यासाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेच्यावतीने चन्नम्मा चौकात आंदोलन करण्यात आले.
कर्नाटक राज्य शेतकरी संघाच्यावतीने मागील काही दिवसांपासून जिल्हय़ात भू- सुधारणा दुरुस्ती कायद्याच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. शुक्रवारी येथील चन्नम्मा चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. सरकारच्या या नव्या कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. त्यामुळे हा कायदाच रद्द करावा, अशी मागणी या संघटनेने केली आहे. यावेळी संघटनेचे नेते चुनप्पा पुजेरी, राघवेंद्र नायक, जयश्री गुरण्णावर, अशोक यमकनमर्डी यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
रेल्वे राज्य मंत्र्यांच्या कार्यालयासमोर धरणे
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या काडा कार्यालयासमोर शेतकऱयांनी धरणे धरली. राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हा कायदा जोवर रद्द होत नाही तोवर विरोध सुरूच ठेवू, अशी भूमिका घेतली. अखेर केंद्रीय राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच राज्य सरकारपर्यंत त्यांच्या मागण्या पोहचवू, असे आश्वासनही दिले.









