भारताच्या संरक्षण उत्पादन उद्योगात देशी उद्योजकांना मिळणार मोठी संधी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात सरकार प्रमाणे खासगी कंपन्यांनाही मोठी संधी उपलब्ध होणार आहे. यासंबंधींच्या ‘ऑपॉरच्युनिटीज फॉर मेक इन इंडिया इन डिफेन्स’ या पोर्टलचा प्रारंभ शुक्रवारी संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केला. या प्रसंगी संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांनीही या कार्यक्रमात भाग घेतला. गेल्या आठवडय़ात सरकारने ‘आत्मनिर्भर सप्ताह’ या कार्यक्रमांतर्गत संरक्षण क्षेत्रात देशी उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात समाधानकारक यश मिळाले आहे.
या सात दिवसांच्या कार्यक्रमात अनेक संस्था व उद्योगांनी भाग घेतला. देशाच्या संरक्षण आवश्यकतांच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली. तसेच विविध उद्योगांबरोबर करार करण्यात आले. संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वयंपूर्णता आणण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम लाभदायक ठरल्याचे राजनाथसिंग यांनी स्पष्ट केले.
पारदर्शकता आणणार
संरक्षण उत्पादन क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी सरकार योजना तयार करीत आहे. खासगी कंपन्यांना या क्षेत्रात मुक्त प्रवेश दिल्याने तंत्रज्ञान विकास होण्यास मोठे साहाय्य होईल. देशाला संरक्षण तंत्रज्ञानाची आवश्यकता असून ते देशातच विकसीत झाल्यास देश लक्षणीय प्रमाणात आत्मनिर्भर होणार हे निश्चित आहे. संरक्षण साधनांची आयात पुष्कळ प्रमाणात कमी करण्याचा सरकारचा विचार आहे.
आणखी साधनांचा समावेश होणार
आणखी संरक्षण साधनांवर येत्या काही दिवसात आयातबंदी करण्यात येणार आहे, अशीही माहिती राजनाथसिंग यांनी दिली.









