प्रतिनिधी / सातारा:
अवघ्या दहा दिवसावर आलेल्या गणेशोत्सवासाठी बाजारपेठ सजली आहे. घरगुती गणपतीच्या मूर्ती चे स्टाँल सजले असून गौरीचे मुखवटे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. सजावटीचे साहित्य महिलांना भुरळ पाडत आहे. यांच्या खरेदीला गर्दी होत आहे.
कोरोनाची गडद छाया यंदाच्या गणेशोत्सवावर पसरली आहे. 22 आँगस्टला गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. याच पार्श्वभूमी घरगुती गणपतीच्या मूर्ती विक्रीसाठी आल्या आहेत. यंदा 3 फुटापर्यत उंचीच्या मूर्ती विक्रेत्याच्या स्टाँलवर आहेत. नियम शिथील झाल्याने मूर्ती खरेदीला गर्दी होत आहे. गणपतीच्या आगमनानंतर तीन दिवसांनी गौरीचे आवाहन घराघरात होते. या गौरीचे आकर्षक मुखवटे, उभारणीचे स्टँड विक्रीला आले आहेत. सजावटीचे साहित्यांनी बाजारपेठ बहरली आहे. दरवर्षी नव्या साडय़ा गौरीला नेसवल्या जातात. यामुळे साडीची मागणी वाढली आहे. हे साहित्य महिलांना आकर्षित करत आहे. सकाळपासून महिला विविध साहित्य खरेदी करताना दिसत आहेत. नियम शिथील झाल्याने गणेशोत्सव साजरी करण्याचा उत्साह वाढला आहे.









