प्रतिनिधी / उस्मानाबाद
उस्मानाबाद लॉकडाऊनचे नियम तोडून पुणे वारी करणारे जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांना अखेर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. उस्मानाबाद लाइव्हने आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांच्या माध्यमातून या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार हे येथील बँक कॉलनीमध्ये एका खासगी जागेत भाड्याने राहतात. ते येथे एकटेच तर त्यांचे कुटूंब पुण्यात राहते.
लॉकडाऊन असताना, अजिंक्य पवार हे १७ एप्रिलला ते पुण्याला कुटूंबाला भेटायला गेले होते. २० एप्रिल रोजी पहाटे ते उस्मानाबादेत परत आले. अजिंक्य पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता मुख्यालय सोडले, त्यांनी खासगी कामासाठी शासकीय वाहनाचा गैरवापर केला. शिवाय प्रशासनाचा पास नसताना पदाचा गैरवापर केला. त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते सुभेदार यांनी केली होती.
अखेर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी अजिंक्य पवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवले असून, त्यांचा पदभार सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले यांच्याकडे देण्यात आला आहे.
Previous Articleसोलापूर शहरात 94 कोरोना पॉझिटिव्ह,एक मृत्यू
Next Article खानापूर तालुक्यात गुरुवारी सात जणांना कोरोनाची लागण








