पंढरपूर / प्रतिनिधी
शहरात गेल्या सात दिवसापासून सुरु असणारा लॉकडाऊन आणखी एक दिवस वाढवण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील लॉकडाऊन आता 14 ऑगस्टपर्यंत करण्यात आला. मात्र यामध्ये शुक्रवारी अत्यावश्यक सेवा सोबत केवळ भाजीपाला विक्रीस मुभा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , पंढरपूर शहरात सात ऑगस्ट 13 ऑगस्ट असा सात दिवसांचा लॉकडाऊन जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला होता. कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी सदरचा लॉकडाऊन करण्यात आला. या सात दिवसांच्या काळात तीन हजाराहून अधिक रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. गुरुवारी लॉकडाऊनचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे शहरात लॉकडाऊन वाढणार की नाही याबाबत दिवसभर चर्चा होती. अखेर गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातून एक दिवस लॉकडाऊन वाढवण्यात आल्याचे आदेश पारित झाले.
वाढीव एक दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत भाजीपाला विक्रीस प्रशासनाकडून मुभा देण्यात आली आहे. यानंतर 15 ऑगस्टपासून मात्र नियमित पंढरपूर शहरातील सर्व आस्थापना या खुल्या होणार आहेत.