वृत्तसंस्था / प्राग
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या प्राग आंतरराष्ट्रीय महिलांच्या टेनिस स्पर्धेत रूमानियाची माजी टॉप सीडेड तसेच विद्यमान द्वितीय मानांकित सिमोना हॅलेपला विजयी सलामीसाठी झगडावे लागले. हॅलेपने स्लोव्हेनियाच्या हेरकॉगचा पराभव करत दुसरी फेरी गाठली.
मंगळवारी झालेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात हॅलेपने हेरकॉगचा 6-1, 1-6, 7-6 (7-3) असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. या सामन्यात हॅलेपला दुसरा सेट गमवावा लागला होता. 31 ऑगस्टपासून न्यूयॉर्कमध्ये सुरू होणाऱया अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत हॅलेप सहभागी होणार आहे. या स्पर्धेपूर्वीची प्रागची ही सरावाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. पहिल्या फेरीच्या अन्य एका सामन्यात द्वितीय मानांकित मार्टिकने रशियाच्या ग्रेश्चेव्हाचा 7-6 (7-2), 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. गेल्या आठवडय़ात पालेर्मो टेनिस स्पर्धेत मार्टिकला उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली होती.









