वर्षाला 18,750 रुपयांचा प्रोत्साहननिधी
वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
आंध्रप्रदेशच्या जगनमोहन रेड्डी सरकारने महिलांच्या बळकटीकरणासाठी ‘वायएसआर चेयुता’ नावाने योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग आणि अल्पसंख्याक समुदायाच्या 23 लाखांपेक्षाही अधिक महिलांना लाभ मिळणार आहे. या योजनेद्वारे महिलांना बँकेच्या माध्यमातून 75,000 रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. या महिलांना व्यापार वाढविण्यास आर्थिक मदत केली जाणार आहे.
राज्य सरकार या कल्याणकारी योजनेवर 17,000 कोटी रुपये खर्च करणार असून याचा लाभ 45-60 वयोगटातील लाखो महिलांना होऊ शकतो. या योजनेच्या अंतर्गत दरवर्षी 18,750 रुपयांचा प्रोत्साहननिधी दिला जाणार आहे. याचबरोबर 45-60 वयोगटातील 8 लाख विधवा आणि एकल महिलांनाही या योजनेत सामील करण्यात आले आहे. सामाजिक निवृत्तिवेतन प्राप्त करणाऱया महिलांनाही या योजनेच्या कक्षेत सामील करण्यात आले आहे.
निवृत्तिवेतनाच्या स्वरुपात या महिलांना प्रत्येक महिन्याला 2,250 रुपये मिळतात. आता याचबरोबर वायएसआर चेयुता अंतर्गत त्यांना दरवर्षी 18,750 रुपयांचाही लाभ मिळणार आहे.









