बा. भ. बोरकरांच्या एका कवितेचे सुंदर गाणे सलील कुलकर्णी यांनी केले आहे. ते म्हणजे ‘तव नयनांचे दल हलले गं’. हे गाणे फारच सुंदर असून चालही इतकी आकर्षक नादमधुर आहे की कोणत्याही स्पर्धेसाठी किंवा कार्यक्रमासाठी हे गाणे बसवण्यासाठी त्या गाण्यावर शिकणाऱयांच्या उडय़ा पडत असतात. याच गाण्याची तालीम चालली असताना ती पाहण्याचा, ऐकण्याचा योग आला. आणि ‘गाणं बसवणं’ ही गोष्ट किती गुंतागुंतीची आहे हे माझ्यासमोर आले. गाणारी मंडळी कितीतरी गाणी बसवत असतात. अगदी शाळकरी मुले ते प्रौढ माणसे तसेच भावगीते ते नाटय़गीते यापासून अगदी चक्क शास्त्रीय चिजांपर्यंत सगळय़ा प्रकारची गाणी बसवणे हा बहुरंगी, बहुढंगी आणि मोठा रंजक प्रवास आहे. ऐकणारे लोक गाणी ऐकत असतात. आवडली की टाळय़ा पिटून मोकळेपणाने दाद देत असतात. पण ती गाणी इतकी सुंदर पद्धतीने सादर कशी होतात हे त्यावेळी ऐकणाऱयांच्या हिशेबात नसते, तर कित्येकांना ते माहितीच नसते. अमुक अमुक माणसाने ते अमुक अमुक गाणे इतके भन्नाट गायिले आहे की खाऊन टाकले आहे सगळय़ांना! पण त्या माणसाने त्या गाण्यावर मेहनत किती घेतली असेल हे गुलदस्त्यातच राहते. अर्थात मेहनत दाखवण्याची ती जागाही नसते म्हणा. पण जाणकाराला मात्र त्या एकेका गाण्यामागचा रियाज, मेहनत दिसत असते. एक गाणे बसवणे हा केवढा मोठा खटाटोप आहे हे त्या गाण्याची तालीम देणाऱया गुरुंना आणि ती तालीम घेणाऱया त्यांच्या शिष्यालाच माहीत असते. आमचे एक आजोबा नेहमी म्हणत असत की, ‘पास झाला हे ऐकणे खूप सोपे असते पण पास होणे, त्यासाठी अभ्यास करणे हे खरे कठीण असते’ त्यातलाच हा प्रकार झाला. गाणे बसवणे हे पक्क्या गाण्याची तालीम आणि तिचा एक भाग म्हणूनही चालते. ते जरी मैफिलीत सादर करण्यासाठी असले, तरीही ते बसवण्याची आणि मग ते टिकवण्याची प्रक्रिया ही निरंतर चालणारी असते असेच म्हणावे लागेल. कारण एकदा प्राप्त केलेल्या चिजांची मांडणी, पर्यायाने उजळणी ही आयुष्यभरासाठी क्रमप्राप्त असते. त्यामध्ये एक राग ओळखीचा करून दिला जात असतो. त्याचे स्वतंत्र नियम कायदे असतात. ते काटेकोरपणे पाळायचे असतात. त्यात अक्षरशः कणभर झालेली चूकही त्या रागाचे अस्तित्वच नाहीसे करण्याइतकी गंभीर पडू शकते. त्यामुळे यामध्ये तयारी करण्याचा मार्गही गाण्याच्या इतर प्रकारांपेक्षा वेगळा असतो.
गजल या विषयाची त्यांच्याच शब्दात बोलायचे तर जमीं पाणी हवा सगळेच वेगळे असते. कारण गजलचा बाज इतर उपशास्त्रीय प्रकारात पूर्ण निराळा! ती मुशायऱयात खुलते तशी बैठकीतही बोलते. गजलसाठी घ्यायची मेहनत पुन्हा वेगळी, अगदी स्वतंत्र! आवाजाला प्रचंड लवचिकता हवी, फिरत हवी. बारकावे दाखवण्याची हिकमत हवी. शिवाय दर्द हा तिचा आत्मा! तो उतरायला हवा असेल तर सूर भिजलेला हवा. भक्तिगीत, अभंगात भक्तिभाव महत्त्वाचा. शरणागत भावाने सादर करायची गोष्ट म्हणजे हे भक्तिसंगीतातले प्रकार आणि भावगीत म्हणजे सर्वात लोकप्रिय आणि तयारीच्या दृष्टीने सर्वात कठीण प्रकार! जो तो गाण्यासाठी भावगीत निवडून आपली हौस भागवतो. घरगुती कार्यक्रमात, मैत्रिणींच्या मंगळागौरीच्या निमित्ताने, ऑर्केस्ट्रामध्ये, खास गाण्याच्या कार्यक्रमात, वेगवेगळय़ा प्रकारच्या स्पर्धात अशा सगळय़ा ठिकाणी सगळय़ात जास्त वापरला जाणारा प्रकार म्हणजे भावगीत. त्यासाठी तयारी वगैरे करायची असते हे ऐकून सर्वसाधारणपणे लोक खुक्कदिशी हसतात. पण जेव्हा एखाद्या कार्यक्रमात एखादे भावगीत अतिशय सुंदर सादर केल्यानंतर हेच लोक विचार करत बसतात की काय अप्रतिम सादर केले यांनी. भावगीत आहे, नाटय़गीत किंवा ख्याल थोडाच आहे? मग आम्ही म्हटले तर ते परिणामकारक का नाही होत? असे काय वेगळे आहे जे हा गायक करतो? तर याचे उत्तर आहे की दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. जे गाणे सोपे आहे म्हणून सगळे गातात. (अर्थात आनंद मिळवणे हा उद्देश मूळ आहे हे मान्यच! कुणीही गावे त्यासाठी!) पण उत्तम सादरीकरणासाठी मात्र ते गाणे बसवावेच लागते. म्हणजेच स्टेजवर गाणे उत्तम प्रकारे ‘उभे’ करायचे असेल तर आधी ते तितक्मयाच मेहनतीने आणि अभ्यासाने ‘बसवावेच’ लागते.
या गाणे बसवत नेण्याच्या आनंदाची तुलना करायचीच झाली तर ती ब्रह्मानंदाशीच करावी लागेल. सर्वप्रथम जे गाणे बसवायचे असेल ते वारंवार ऐकणे महत्त्वाचे असते. शेकडो वेळा ऐकून ऐकून त्याची किमान आउटलाइन एक आकृती म्हणून मनात निश्चित होते. त्यानंतर ती वारंवार म्हणून बघितली जाते. यावेळी एखाद्या सापळय़ाइतकेच(?) ते तयार झालेले असते. खरी तयारी त्यापुढेच तर सुरू होते. त्या गाण्याचे शब्द कसे टाकावेत, ते कोणत्या वजनाने टाकावेत, ते कसे उच्चारावेत, त्यातला कोणता शब्द मोठय़ाने उच्चारायचा आहे आणि कोणता शब्द हळुवारपणे घ्यायचा आहे या सगळय़ाचा अभ्यास आवश्यक असतो. महत्त्वाचे म्हणजे त्या शब्दांमागे कोणते स्वर कशाप्रकारे वापरले आहेत, अगदी कोणत्या अक्षरांवर कोणते स्वर आहेत, आणि त्यात मींड, कणस्वर, स्वरसूक्ष्मता कशाप्रकारे दाखवायची आहे, मुळात त्यातले सगळे स्वर निर्दोषपणे अचूक दाखवणे हे एक दिव्य असते. हे बारकावे समजून जेव्हा गाणे गायिले जाते तेव्हा ते सुंदर घडते. आणि हे बारकावे सर्वसाधारणपणे बघितले किंवा तयार केले जात नाहीत. त्यामुळे ऐकणाऱयाला फरक लक्षात येतो. पण बऱयाचदा तपशील कळून येत नाहीत. तालाच्या बाबतीतही तसेच. काहीजण मुळापासून तालाबरोबरच तयारी करतात तर काहीजण आधी त्या गाण्याच्या स्वरांची तयारी करून मग तालाचा अभ्यास पक्का करतात. गाण्याच्या तयारीमध्ये लयीच्या अभ्यासाचेही अनन्यसाधारण महत्त्व असते. गाण्याच्या मूडप्रमाणे बऱयाचदा गाण्याची लय बदलत जाते. विषयानुरूप पॉजेस कुठे असावेत हे ठरते. गाण्यातील कोणतीही जागा एकवेळ मात्राविरहित असू शकते पण ती लयविरहित कधीच असत नाही. तो रिक्त असणारा कालाचा तुकडा अर्थपूर्ण लयीतल्या स्वरांसहित भरायचा असतो. अक्षरशः नाजुक नक्षीच्या भरतकामासारखाच हा प्रकार असतो. तिथे खंड न पडू देणे हे कौशल्य असते. या अशा सर्व गोष्टींची जेव्हा विद्यार्थ्यांकडून जाणकार गुरु कसून आणि कसोटीवर घासून तयारी करून घेतात तेव्हा मैफिलीत ते गाणे हिऱयासारखे लखलखीतपणे सादर करता येते आणि ऐकणाऱया माणसाला साश्चर्य आनंद होतो आणि प्रश्नही पडतो की हे असे प्रभावी मी का नाही सादर करू शकत? तर त्याचे हे उत्तर आहे लहान मूलही आधी नीट बसायला लागते, तेव्हाच ते नंतर नीटपणे उभे राहायला लागते आणि सरतेशेवटी चालायला सुरुवात होते. गाण्याचे तेच आहे.
अपर्णा परांजपे-प्रभु








