तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी
आज राज्यामध्ये बार्शी तालुका हा रेशन धान्य काळ्याबाजाराच्या प्रकारांमध्ये नकारात्मक भूमिकेतून गाजत आहे. बार्शी आणि वैराग बाजार समितीमधील व्यापारी आणि इतर रेशन दुकाने यांनी सर्वसामान्य गोरगरिबांसाठी आलेला रेशनचा गहू आणि तांदूळ अवैधरित्या काळ्याबाजारात विकलेला आणि साठा केलेला पोलिसांनी आणि महसूल पथकाने छापा टाकून पकडल्याने बार्शी तालुक्याची बरीच नाचक्की झाली आहे. महसूल प्रशासनिक आणि पोलिसांच्या पातळीवर रेशनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचे पितळ उघडे करण्याचे काम चालू असून, पोलीस आणि महसूल यांनी बऱ्याच ठिकाणी छापा टाकून हजारो टन धान्य जप्त केले आहे. संबंधित लोकांवरती गुन्हे दाखल केले आहेत. मात्र या रेशन घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी आहे. अशी शंका आता सर्वच यंत्रणेला येऊ लागली आहे. अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आता उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार ओम राजे निंबाळकर यांनी या काळ्याबाजाराचा छडा लावण्यासाठी आदेश पारित केले आहेत. मात्र ओमराजे निंबाळकर यांचे आदेश म्हणजे थेट रेशन घोटाळ्याच्या मुळावरती घालणारे आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बार्शी तालुक्यातून आणि इतर ठिकाणावरून व्यापारी भीमाशंकर खाडे यांनी रेशन धान्य विक्रीसाठी पाठवत असताना पनवेल पोलिसांनी पकडले होते. सुमारे 110 टन रेशन धान्य काळ्याबाजारात विकण्यास नेण्यासाठी पकडला असताना तेथून हे प्रकरण उघडकीस आले, आणि सबंध जिल्हाभर यंत्रणा कार्यान्वित झाली. मात्र या प्रकरणाकडे खासदार ओमराजे यांचे सुरुवातीपासूनच बारीक लक्ष होते. दैनिक तरुण भारत संवाद ला वेळोवेळी त्यांनी माहिती दिल्या प्रमाणे खासदार ओमराजे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याचे आदेश संबंधित विभागाला आणि पनवेल पोलिसांना दिले होते. खासदार ओमराजे यांनी महसूल आयुक्त पुणे व पोलीस आयुक्त कोल्हापूर, मुंबई, ठाणे यांच्याशी त्यांनी वार्तालाप केला होता, आणि या प्रकरणी कोणत्याही व्यक्तीस सोडू नका असे आदेश दिले होते. या संपूर्ण प्रकरणाची खोलवर चौकशी करा, आणि गुन्हेगाराला योग्य ती शिक्षा द्या अशी भूमिका खासदार ओमराजे यांनी घेतलेली पाहायला मिळाली, तसेच त्यांनी या प्रकरणी अनेकदा अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशीही चर्चा करून चौकशी करण्यासाठी एक रोडमॅप तयार केला होता त्याप्रमाणे ही चौकशी आता चालू झाली आहे.
खासदार ओमराजे यांच्या सूचनेनुसार आज बार्शी तहसीलदार डी एस कुंभार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रेशन घोटाळ्याच्या मुळावर घाव घालण्यासाठी प्रयत्न चालू केले असल्याचे पाहायला मिळाले. खासदार ओमराजे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणारे व्यापारी जेवढे गुन्हेगार आहेत तेवढेच रेशनचा माल आपल्या दुकानात न वाटता मार्केटला विकणारे रेशन दुकानदार ही गुन्हेगार आहेत अशी ठाम भूमिका निंबाळकर यांनी घेतलेली पाहायला मिळाली. खासदार निंबाळकर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आज बार्शी तहसील कार्यालयामध्ये बार्शी शहर आणि तालुक्यातील सर्व रेशन दुकानदार यांची बैठक बोलविण्यात आली. या बैठकीमध्ये सर्व रेशन दुकानदार यांना पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये त्यांना आलेले सर्व प्रकारच्या योजनेचे धान्य पावती प्रमाणे त्यांनी विकलेला माल अशी प्रत्येक रेशन कार्ड नुसार माहिती बार्शी तहसील ला जमा करण्यास सांगितले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये ही सर्व माहिती प्राप्त झाल्यानंतर आलेला माल , वाटप माल आणि मोफत वाटप केलेल्या प्रत्येक योजनेतील माल याचे वर्गीकरण करून त्याची आकडेवारी निश्चित केली जाणार आहे. आणि या सर्व रेशन दुकानदार यांनी दिलेल्या यादीप्रमाणे पोहोचला का नाही याची खात्री केली जाणार आहे. त्यामुळे आता या रेशन धान्य काळाबाजार च्या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून जेवढी या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. तेवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई व्हायला याप्रमाणे मदत होणार आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेल्या निर्णयामुळे रेशन दुकानदार यांच्यात घबराटीचे वातावरण पसरले असून माहिती संकलित काम करण्याचे काम युद्धपातळीवर दुकानदारांनी चालू केले आहे. आज ही बैठक बार्शी तहसील नायब तहसीलदार संजीवन मुंडे बार्शी पुरवठा निरीक्षक अभय कुमार साबळे, पुरवठा अव्वल कारकून धनवडे यांनी घेतली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








