सांगलीच्या नूतन बुद्धिबळ मंडळाचा देशभर नावलौकिक आहे, तो गेली 54 वर्षे कोणत्याही संकटाला न डगमगता उन्हाळय़ाच्या सुट्टीमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ स्पर्धा घेण्यासाठी. बुद्धिबळाचे भीष्माचार्य स्व. भाऊसाहेब पडसलगीकर यांनी अत्यंत जिद्दीने हे मंडळ चालवले. त्यांच्या मृत्यूच्या अकरा वर्षानंतरही हे मंडळ उत्तम पद्धतीने सुरू आहे. प्रशिक्षण आणि स्पर्धा याद्वारे नव्या पिढीमध्ये बौद्धिक सक्षमतेची जागृती करण्यात ते महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. भाऊसाहेबांनी आपल्या हयातीत राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धा भरवून सांगलीची क्षमता जगाला दाखवून दिली होती. काहीही झाले तरी सांगली स्पर्धा होतेच याची भारतभर खात्री आहे. त्यामुळे प्रत्येक सुट्टीचा हंगाम हा सांगलीसाठी बुद्धिबळ महोत्सवाचा हंगाम ठरत असतो. कोरोनाने संपूर्ण जग स्तब्ध झालेले असताना या बुद्धिबळ स्पर्धांवरही प्रश्नचिन्ह लागले होते. नाही म्हणायला विश्वनाथन आनंदच्या जगभरातील खेळाडूंबरोबरच्या स्पर्धांच्या बातम्या रोज येत होत्या. ते तंत्रज्ञान सांगलीत कसे उभे राहणार अशी अनेकांना शंका होती. मात्र मंडळाच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी अत्यंत झटपट निर्णय घेत आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धा घेण्याचा निर्धार केला आणि जगभरातील एक हजारहून अधिक खेळाडू ऑनलाइन या स्पर्धेत सहभागी झाले. सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या पांडुरंग भार्गव सोमण स्मृती ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत उज्बेकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय मास्टर अब्दीमालिक अब्दीसालिमोह याने 80 गुणांसह विजेतेपद पटकावले. तामिळनाडूचा फिडे मास्टर एल आर श्रीहरी हा 60 गुणांसह उपविजेता ठरला. कर्नाटकच्या मानांकित निहाल शेट्टी याने 53 गुणांसह तिसरे स्थान, दिल्लीच्या हेडमास्टर आर्यन वार्षणेय याने 52 गुणांसह चौथे तर बंगालचा मानांकित खेळाडू राजदीप सरकार याने 50 गुणांसह पाचवे स्थान मिळविले. 1080 ही एकूण सहभागी खेळाडूंची संख्या होती. बुद्धिबळ म्हणजे समोरासमोर बसून खेळायचा डाव. दीड फुटाचेही अंतर दोन खेळाडूंमध्ये राहत नाही, अशावेळी या स्पर्धा घेणे म्हणजे जिकिरीचे काम. मात्र ऑनलाईन स्पर्धेच्या पर्यायामुळे दोनशे-तीनशे खेळाडूंच्या ऐवजी जगभरातून हजाराहून अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले, हे मोठेच यश मानायला हवे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, पुणे, नागपूर अशा राजधानी, उपराजधानी दर्जाच्या शहरांमध्ये स्पर्धा घेणे आणि सांगलीसारख्या जिह्याच्या ठिकाणी स्पर्धा घेणे यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो. मात्र सातत्यपूर्ण पाच दशकांची तपश्चर्या, भारतातील अनेक मान्यवर खेळाडू,
ग्रँड मास्टर यांच्या क्रीडा कारकिर्दीसाठी मोलाचे ठरलेल्या स्पर्धा घेणारी सांगली अशा प्रयत्नांमधून जगाच्या बरोबर चालताना दिसली, हे महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर बुद्धिबळाच्या क्षेत्रातील मान्यवर खेळाडूंनी ऑनलाइन एकत्र येत स्पर्धा खेळण्याचे आकर्षण भारतातातही मोठे आहे. एखाद्या रशियन खेळाडू बरोबर विश्वनाथन आनंदची चालणारी स्पर्धा घरबसल्या ऑनलाइन पहायला मिळण्याची पर्वणी नव्या आणि जुन्या पिढीतील सर्वच खेळाडूंना कोरोना काळाने उपलब्ध करून दिली. तशीच ध्येयवादी मंडळांना आणि कार्यकर्त्यांना एक नवी वाट निर्माण करून दिली. नूतन बुद्धिबळ मंडळाने त्याचा पुरेपूर वापर करून घेतला आणि लॉकडाऊनमध्येसुद्धा जगभरातील खेळाडूंना खेळवून भारतातील नव्या दमाच्या खेळाडूंना मोठी संधी उपलब्ध करून दिली. काळाच्या बरोबर बदलताना घेतलेल्या स्पर्धा आणि 1968 सालापासून सुरू असलेल्या स्पर्धा यामध्ये बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, उज्बेकिस्तान अशा देशांमधून येणारे खेळाडू हे सांगलीच्या स्पर्धांचे आकर्षण होतेच. ऑनलाईनच्या निमित्ताने आता विस्ताराचे वातावरण निर्माण होणे हे सुचिन्हच म्हणावे लागेल. कोरोनाचे वातावरण निवळल्यानंतर सांगलीला मोठी स्पर्धा आयोजनाची संधी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनांकडून मिळण्याची वाट यामुळे अधिक सुकर झाली आहे. नजीकच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवरील मीनाताई शिरगावकर आणि बाबुकाका शिरगावकर बुद्धिबळ स्पर्धेची तयारीही सांगली करत आहे. गेली 11 वर्षे सांगलीत आंतरराष्ट्रीय मास्टर्स नव्या पिढीच्या मुलांना कोचिंगसाठी आणले जात आहे. अवघ्या 20 वर्षे वयाची मुले आता व्यावसायिक खेळाडूंप्रमाणे खेळण्याची स्वप्ने पाहू लागली आहेत. इंटरनेटच्या माध्यमाने त्यांच्यासाठी जगाचे द्वार खुले झाले आहे. संगणक खेळाडूंमध्ये भेद करत नाही. त्यामुळेच एखादा नवखा खेळाडू चांगला खेळत असेल तर त्याची स्पर्धा थेट एखाद्या ग्रँडमास्टर बरोबरसुद्धा होऊ शकते. आज विशीत असलेली पिढी या ऑनलाईनच्या माध्यमातून जगभरात स्पर्धा आणि बक्षिसे जिंकत आहे. भारतात स्पर्धा खेळून तासभर विश्रांती घ्यायची आणि पुन्हा जगातल्या दुसऱया कुठल्यातरी देशातील स्पर्धेत उतरायचे अशा पद्धतीने अवघ्या विशीतील युवक आज आपल्या पुढील स्पर्धांसाठीचा पैसा या ऑनलाईन स्पर्धातून उभा करू लागले आहेत. अर्थात तंत्रज्ञानाचा जसा फायदा होतो तसाच त्याचा गैरवापर होऊ शकतो याची जाणीव जागतिक बुद्धिबळ संघटनांना आहे. ऑनलाइन खेळणारा एखादा खेळाडू या तंत्राच्या सहाय्याने चाली चोरून मात करू शकतो. अशा प्रकारच्या चालींना चोरी ठरवून कारवाईचे कामही ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सुरूच आहे. त्यामुळे ऑनलाइन स्पर्धांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मानांकने मिळायला अजूनही थोडा वेळ लागेल मात्र सांगलीत निर्माण झालेली ही ‘नूतन’ वाट बुद्धिबळाच्या क्षेत्राला नवी गती आणि छोटय़ा छोटय़ा गावांमध्येही बुद्धीची चमक दाखवणाऱया आजच्या पिढीला नवे क्षितिज देणारे ठरणार आहे हे मात्र निश्चित!
Previous Articleहरिशंकर परसाई
Next Article महाराष्ट्रात आज दिवसभरात 13,348 रुग्ण कोरोनामुक्त
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








