वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2021 च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेच्या पूर्वतयारी योजनेनुसार येथील इंदिरा गांधी नॅशनल स्टेडियमवर शुक्रवार दि. 14 ऑगस्टपासून राष्ट्रीय सायकलींग सराव शिबिराला प्रारंभ केला जाणार आहे. या शिबिरात दाखल होणारे 11 सायकलपट, चार प्रशिक्षक आणि 16 साहाय्यक प्रशिक्षक कोरोना चांचणीत निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले.
या सराव शिबिरात सहभागी होणाऱया 11 सायकलपटू, चार प्रशिक्षक आणि अन्य 16 साहाय्यक प्रशिक्षकांना यापूर्वी मर्यादित कालावधीसाठी क्वॉरेंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. भारतीय क्रीडा प्रधिकरण मंडळाच्या (साई) प्रशासकीय समितीने या सराव शिबिरात सहभागी होणाऱया सर्व व्यक्तींची कोरोना चांचणी यापूर्वीच घेतली आहे. कोव्हिड-19 संदर्भात सर्व सुरक्षेवर भर देण्यात आला आहे. शिबीर सुरू होण्यापूर्वी सर्व सायकलपटू, प्रशिक्षक आणि साहाय्यक प्रशिक्षक वर्गाची पुन्हा एकदा कोरोना चांचणी घेतली जाणार असल्याचे साईच्या प्रवक्त्याने सांगितले. सायकलपटू, प्रशिक्षक आणि साहाय्यक प्रशिक्षक वर्गासाठी क्वॉरेंटाईन विभाग तयार केला असून या विभागाला ग्रीन झोन असे नामकरण करण्यात आले आहे. या विभागामध्ये बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. साईतर्फे या विभागात डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफची सुविधा करून देण्यात आली आहे. बेंगळूरमधील साईच्या केंद्रात हॉकी शिबिरासाठी दाखल झालेले कर्णधार मनप्रित सिंगसह अन्य पाच हॉकीपटू कोरोना चांचणीत दोषी असल्याचे आढळून आले आहे.









