प्रतिनिधी / बेळगाव
शण्मुखारुढ मठ, विजापूर व शांताश्रम, हुबळीचे पीठाधिपती अभिनव शिवपुत्र स्वामीजी (वय 64) यांचे शुक्रवारी रात्री बेळगाव येथील खासगी इस्पितळात निधन झाले.
दोन दिवसांपासून त्यांच्यावर विजापूर येथे उपचार सुरू होते. शुक्रवारी सायंकाळी केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात त्यांना हलविण्यात आले. उपचारांचा उपयोग न होता त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांचे उत्तराधिकारी अभिनव सिद्धारुढ स्वामीजी यांनी दिली आहे.
गदग तोंटदार्य मठाचे जगद्गुरू डॉ. तोंटद सिद्धराम स्वामीजी, कारंजी मठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी, साधू संस्थानमठ इंचलचे शिवानंद भारती स्वामीजी, नांगनूर रुद्राक्षी मठाचे अल्लमप्रभू स्वामीजी, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, पालकमंत्री रमेश जारकीहोळी आदींनी स्वामीजींना श्रद्धांजली वाहिली आहे.
धार्मिक क्षेत्राची हानी
अभिनव शिवपुत्र स्वामीजींच्या देहावसानाने धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची हानी झाली आहे, अशा शब्दात कारंजीमठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. धर्मप्रसाराच्या कार्यात ते नेहमी आघाडीवर असायचे. गुरुकुलाची स्थापना करून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविले आहे. काशीमध्ये शिक्षण घेताना आम्ही दोघे एकत्र होतो. अद्वैत वेदांत प्रसारात त्यांचे कार्य मोठे आहे, असे स्वामीजी पुढे म्हणाले.









