ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्य प्रदेश सरकारने लॉक डाऊनच्या नियमात आता थोडी सूट दिली आहे. राज्यात आता केवळ रविवारी लॉक डाऊन सुरू रहाणार आहे, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत केली.
ते म्हणाले, राज्यात याआधी शनिवारी आणि रविवारी लॉक डाऊन जारी करण्यात आला होता. त्यात आता बदल करण्यात आला असून आता केवळ रविवारी लॉक डाऊन असणार आहे. या सोबतच बाजारचा कालावधी देखील वाढवण्यात आला आहे. त्यामुळे मार्केट आता रात्री 8 च्या ऐवजी रात्री 10 पर्यंत सुरू राहणार आहे.
तसेच नाईट कर्फ्यूची वेळ बदलण्यात आली असून आता रात्री 8 ऐवजी रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत हा कर्फ्यू सुरु राहील. तर हॉटेल आणि रेस्टॉरंट देखील रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवली जाणार आहे, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.









