सोने प्रतितोळा 57 हजार रुपयांवर : चांदीदर पखितकिलो 78 हजारांसमीप
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात सोन्याचा दर विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. तसेच चांदीच्या दरांनी देखील 75 हजारांचा टप्पा पार केला आहे. सलग सोळाव्या दिवशी दरांमध्ये झालेल्या वाढीमुळे शुक्रवारी राजधानी दिल्लीत सोने प्रतितोळा 57,008 रुपये या सर्वोच्च किंमतीवर पोहोचले होते. तसेच चांदी दरातही वाढ झाल्याने त्याची किंमत प्रतिकिलो 77,840 रुपये झाला आहे.
चांदी दरात शुक्रवारी 576 रुपयांनी वाढ झाली. गुरुवारअखेर चांदीचा दर 77,264 रुपये प्रतिकिलो इतका होता. सोने दरात मात्र शुक्रवारी किरकोळ वाढ झाली. गुरुवारी प्रति दहा ग्रॅम 57,002 रुपयांवर असलेला दर 6 रुपयांनी वाढून 57,008 या आतापर्यंतच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतींनी उसळी घेतल्यानंतर त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्यावर झाला आहे. जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच सोन्याचा दर 57 हजाराच्या पुढे गेला आहे. तर चांदीची किंमत 80 हजाराच्या जवळ पोहचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने दोन हजार डॉलरच्या पार जात 2 हजार 58 डॉलरवर पोहोचले. हा गेल्या 7 वर्षातील सर्वोच्च दर आहे. चांदीचा दर गुरुवारी 28.40 डॉलरवर गेला होता.









