कुरुंदवाड / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांसाठी कोल्हापूर येथील सैनिक दरबार हॉलच्या प्रमाणे नृसिंहवाडी येथील संजय हॉल येथे 50 बेडचे स्वतंत्र कोविड तपासणी केंद्र सुरू करण्यात यावे असा प्रस्ताव शिरोळच्या तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ ज्यांच्याकडे दिला असल्याची माहिती मयूर उद्योग समूहाचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी दिली.
ते म्हणाले शिरोळ तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, मात्र त्यांच्या तपासणीसाठी पुरेसी यंत्रणा नाही. त्या रुग्णांना इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली, मिरजकडे धाव घ्यावी लागते त्यामुळे तालुक्यातील दक्षिण भागातील लोकांसाठी खास करून मध्यवर्ती ठिकाण म्हणजे नृसिहवाडी हे आहे. येथील शिरोळ मार्गावर असणारा संजय हॉल येथे त्या स्वरूपाची तपासणी यंत्रणा उभी राहू शकते. प्रशस्त हॉल पार्किंगची व्यवस्था स्वतंत्र किचन व्यवस्था व नागरी वस्तीपासून बाजूला मुख्य रस्त्यावर असल्याने येथे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात कोणतीच अडचण येणार नाही. संजय हॉल येथे 50 बेडची व्यवस्था होऊ शकते, जेणेकरून या भागातील रुग्णांची तपासणी व व्यवस्था येथे होऊ शकते याकरता मयूर उद्योग समूहा मार्फत सर्व सहकार्य करण्यात येणार असून सर्व सुविधा साठी प्रयत्न केला जाणार आहे अशा स्वरूपाचा प्रस्ताव शिरोळच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्याकडे दिला आहे.
दरम्यान तहसीलदार मोरे-धुमाळ यांनी याबाबत सकारात्मक विचार करण्याची ग्वाही दिली असून त्या ठिकाणाची पाहणी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे सांगितल्याचे समजते. दरम्यान पाटील यांनी कोरोना बाधित रुग्णांसाठी वाडी-शिरोळ मार्गावर असणारा संजय हॉल उपयुक्त ठरेल व संबंधित रुग्णांची ही सोय तेथे होईल यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले