प्रतिनिधी /रत्नागिरी :
जिह्यात मागील 48 तासांत मुसळधार पावसाने ठिकठिकाणी चांगलाच तडाखा देला आहे. रत्नागिरी तालुक्यातील जयगड-कळझोंडी योथील दोन वाडय़ांना जोडणारा पुलाचा एक खांबच कोसळला असून तेथे पडलेल्या भगदाडामुळे ग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे. पुलाशेजारी असलेल्या एका घराला त्यामुळे मोठे तडे गेल्याने कुटुंबियांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
मुसळधार पावसात बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. जयगड कळझोंडी येथील दोन वाडय़ांना जोडणाऱया पुलाचा एक खांब पूर्णतः कोसळला आहे. यात पुलावरील रस्त्यावर एक मोठा खड्डा पडल्याने व काही भाग कोसळल्याने गानसुरवाडीकडे जाण्या-येण्याचा मार्ग बंद झाला आहे. पुलावरून होणारी वाहतूक बंद झशल्याने येथील ग्रामस्थांना खंडाळामार्गे सुमारे 6 किलोमीटरचा वळसा पडणार आहे.
मागील वर्षीच हा पूल खचला होता. त्यावेळी जिल्हा परिषदेने तात्पुरती डागडुजी केली होती. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने गांभीर्याने न बघितल्याने आज हि परिस्थती ओढवल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या पुलाशेजारी तुकाराम फडकले यांचे दुमजली घर आहे. या घरालादेखील मोठे तडे गेले आहेत. सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत हे घर असून घरातील कुटुंबाला स्थलांतरीत करण्यात आले आहे.









