जिल्हयात अतिवृष्टीमुळे वाहतुक विस्कळीत
प्रतिनिधी / चिपळूण
दोन दिवसांपासून जिल्हय़ात होत असलेल्या अतिवृष्टीचा फटका मुंबई-गोवा महामार्गालाही बसला आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे महामार्गावरील राजापूरमधील अर्जुना, संगमेश्वरमधील बावनदी, लांजातील आंजणारी आणि सायंकाळी चिपळुणातील वाशिष्ठी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. दुसरीकडे कुंभार्ली घाटात मंगळवारी रात्री दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. नैसर्गिक आपत्तीमुळे महामार्गावर आलेल्या या विघ्नामुळे गणेशोत्सवासाठी येणाऱया चाकरमान्यांना अर्ध्या रस्त्यातच अडकून पडावे लागले.
सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने कोकणात धुमाकूळ घातला आहे. रायगडपासून रत्नागिरीपर्यंत पावसाचा जोर बुधवारीही कायम राहिल्याने नद्यांना पूर आला आहे. चिपळूण, संगमेश्वर, खेड, राजापूर आदी शहरात मंगळवारी पुराचे पाणी घुसल्यानंतर बुधवारीही दिवसभर या भागातील पूरजन्यस्थिती कायम आहे. महामार्गावरील जगबुडी, वाशिष्ठी, सावित्री, बावनदी या सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने धोकादायक असलेले जुने पूल तत्काळ बंद करण्यात आले. बुधवारी सकाळी संगमेश्वरमधील बावनदी पूल वाहतूकीस बंद करण्यात आला. या पुलापाठोपाठ पाणीपातळी वाढल्याने राजापूरमधील अर्जुना, त्यानंतर रत्नागिरी-लांजा मार्गावरील आंजणारी पूलही वाहतुकीस बंद करण्याचे आदेश देण्यात आले. सायंकाळी 5.15 वाजता चिपळुणातील वाशिष्ठी पूलही वाहतुकीसाठी बंद करत लहान वाहतूक उक्ताड-फरशी बायपासमार्गे वळवण्यात आली. वाशिष्ठीने धोक्याची पातळी ओलांडली नसली तरी जोरदार पर्जन्यवृष्टीने नदीतील पाण्याचा विसर्ग लक्षात घेऊन पुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
चाकरमान्यांसाठी अडथळय़ांची शर्यत
गणेशोत्सवासाठी ग्रामपंचायतांची डेडलाईन पाळण्यासाठी चाकरमान्यांची धावपळ सुरू असताना पूल बंद केल्याने प्रवासाचा खेळखंडोबा झाला आहे. अगोदरच परवानगी, बसेस आणि विलगीकरण आदी प्रश्नांवर सरकारचे धोरण लांबले असतानाच त्यात नैसर्गिक आपत्तीची भर पडली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर 12 ऑगस्टपर्यंत चाकरमान्यांची वाहतूक कोकणात मोठय़ा प्रमाणावर होणार आहे. मात्र मुसळधार पावसामुळे चाकरमान्यांच्या मार्गात विघ्न आले आहे.
कुंभार्ली घाटात दरड कोसळली
मुंबई-गोवा महामार्गावरील नद्यांच्या पुरामुळे वाहतुक बंद करण्याची वेळ आली असतानाच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱया कुंभार्ली घाटातही मंगळवारी रात्री 9.30 वाजता दरड कोसळण्याची घटना घडली. तासाभरातच दरड दूर करण्यात यश आले असले तरी दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे.
चार नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
जिल्हय़ातील आठ प्रमुख नद्यांपैकी चार नद्यांनी बुधवारी सायंकाळी धोक्याची पाणीपातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली. प्रशासनाने सायंकाळी 4 वाजता जाहीर केलेल्या पाणीपातळी आकडेवारीनुसार जगबुडीची धोका पातळी 7 मीटर असताना ती 7.60 पातळीवर वाहत आहे. काजळीनदी 18 मीटरची धोकापातळी पार करून 19.96 मीटर पातळीवर तर कोदवली नदी 8.13 मीटरची धोकापतळी पार करत 8.20 मीटर, तर बावनदी 11 मीटर धोकापातळी असताना 11.90 मीटर पातळीवर वाहत होत्या. त्याचबरोबर वाशिष्ठी, शास्त्री, सोनवी, मुचकुंदी आदी नद्याही दुधडी भरून वाहत होत्या.
महामार्गावरील सहा पुलांवर ‘वॉच’
कोकणात महाडमधील सावित्री पूल दुर्घटनेनंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिटीशकालीन पुलांची चर्चा पावसाळय़ात नेहमी होत असते. महामार्गावरील जुन्या पुलांचे ऑडीटमध्ये ते धोकादायक नसले तरी दुरूस्ती मात्र आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र नवीन पूल होत असल्याने जुन्या पुलावरच खर्च टाळण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळय़ात डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे वाशिष्ठी, शास्त्री, सोनवी, सप्तलिंगी, बावनदी, आंजणारी आणि अर्जुना हे सहाही ब्रिटीशकालीन पूल शासनदप्तरी धोकादायक असल्याने पावसाळय़ात या पुलांवर चौवीस तास कर्मचारी तैनात करून वॉच ठेवला जात आहे.