वार्ताहर/ संगमेश्वर
ंसंगमेश्वर तालुक्यात सलग 3 दिवस मुसळधार पाऊस पडत असून मुसळधार पावसामुळे संगमेश्वर बाजारपेठ, फुणगूस, वांद्री, कसबा, माखजन बाजारपेठांना पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे. पुराचे पाणी नदीकाठच्या गावांतून शिरले आहे. महामार्गावरील बावनदी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून महामार्गावरील सोनवी, शास्त्राr, आरवली पुलांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
सलग 3 दिवस मुसळधार पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे शास्त्राr, सोनवी, असावी, बावनदीचे पुराचे पाणी लगतच्या गावांतून घुसले आहे. शास्त्राr नदीचे पाणी घुसून आठवडा बाजारपेठेतील घरे व दुकाने पाण्याखाली गेली आहेत. मंगळवारी सायंकाळी पुराचे पाणी रामपेठ व संगमेश्वर आठवडा बाजारपेठेतील काही घरांमध्ये घुसले होते. रामपेठ व आठवडा बाजारपेठेतील 60 घरांना नोटीस देवून स्थलांतर करण्यास सांगण्यात आले होते. सलग दुसऱया दिवशी बुधवारीही आठवडा बाजार व रामपेठमधील काही घरांमध्ये पाणी घुसलेलेच आहे. त्यामुळे रामपेठवासीयांनी रात्र जागूनच काढली. कसबा गावातील 55 घरांना धोक्याची नोटीस देण्यात आली आहे. तसेच 5 घरांमध्ये पुराचे पाणी घुसले. पहिल्याच पावसात शास्त्राr पूल येथे दरड कोसळून धोकादायक झालेल्या घरांना पुन्हा नोटीस देवून महसूल विभागाने सुरक्षितस्थळी हलविले आहे. असुर्डे येथील काही घरांनाही धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. तर फुणगूसमधील दुकाने व काही घरांतील रहिवासीयांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तर वांद्री बाजारपेठेलाही पुराच्या पाण्याचा फटका बसला असून वांद्री बाजारपेठेतील काही घरे पुराच्या पाण्याखाली गेली आहेत. अलकनंदा नदीला पूर आल्याने चालुक्य राजवटीतील मंदिरे पुराच्या पाण्याखाली गेली आहेत. म
नायरी खोऱयातील घरांचा संपर्क तुटला
कसब्याकडे जाणाऱया मार्गावर पुराचे पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. त्यामुळे नायरी खोऱयातील गावांचा शहरातील संपर्क तुटला आहे. नायरी खोऱयात फणसवणे, कसबा, शृंगारपूर, उमरे, कळंबस्ते आदी गावांतील संपर्क तुटला आहे. या मार्गावर जाणाऱया वाहनांच्या कसबा लेडी येथे रांगा लागल्या होत्या.
परचुरी पूल पुराच्या पाण्याखाली
परचुरी गावाला जोडणारा कोळंबे-परचुरी पुलावरुन पुराचे पाणी जावून पूल पाण्याखाली गेला आहे. परचुरी गावातील वाडय़ांचा संपर्क तुटला आहे. तसेच शिवने पुलाच्या दोन्ही बाजूला पुराचे पाणी साचल्याने या गावातील संपर्क तुटला आहे. संगमेश्वर बाजारपेठेतून असुर्डे गावाकडे जाणाऱया पुलाच्या येथे पाणी भरल्याने असुर्डे पुलावरील वाहतुकीवर परिणाम झालेला दिसत असून गावांतील वाहतूक ठप्प झाली आहे.
महामार्गावरील वाहतूक ठप्प
महामार्गावरील बावनदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने हा पूल मंगळवारी रात्री वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. तसेच शास्त्राr, सोनवी, आरवली पुलावरील वाहतूक ऐकरी ठेवण्यात आली असून पुलांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून खबरदारी घेण्यात येत आहे.
दुकानदारांनी आपला माल हलविला सुरक्षितस्थळी
सोमवारपासून मुसळधार पावसानंतर मंगळवारी सायंकाळी पुराचे पाणी बाजारपेठांतून घुसल्याने दुकानदारांनी आपला माल सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात केली. अनेक दुकानदारांनी सुरक्षितता म्हणून आपला माल हलविल्याने त्यांचे मोठे नुकसान टळले आहे.
अनेक बसेस रद्दमुळे संगमेश्वर बसस्थानकात गर्दी
नायरी खोरे, फुगणूस डिंगणी रस्त्यासह बावनदी पुलावरील वाहतूक बंद केल्याने संगमेश्वर बसस्थानकात अनेक बसेस थांबवण्यात आल्या होत्या. त्यामुळे बाहेरगावातून आलेल्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. अनेक बसेस रद्द कराव्या लागल्याने प्रवाशांचे हाल झाले.