*मुंबई-गोवा महामार्गावर बावनदी पुलावरून वाहतूक रोखली
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यांत किनारपट्टीवर बुधवारी आणि गुरुवारी ही अतिवृष्टी ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक भागात पूरस्तिथी निर्माण झाली आहे. रत्नागिरीतील चांदेराई बाजारपेठ पाण्याखाली गेली असून या ठिकाणी पावसाचा वेग कायम राहिल्यास आणखी गंभीर संकट उभे राहणार आहे.
आज बुधवारी सकाळपासूनच मुंबई, सह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. गुरुवारी पालघर आणि ठाणे जिल्ह्यत अतिवृष्टी, मुंबईत मुसळधार, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात राज्याच्या उत्तरेस तयार झालेली चक्रवाती वर्तुळाकार स्थिती (सायक्लोनिक सक्र्युलेशन) दक्षिणेकडे सरकत असून, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.
बावनदीच्या पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटाच्या पायथ्याला असलेला बावनदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. बावनदीला पूर आल्याने पोलिसांनी ब्रिटिशकालीन पुलावरील वाहतूक रोखली आहे. बावनदीच्या पाण्याची धोक्याची पातळी 11 मी इतकी आहे. मात्र आता 11.30 मी इतके पाणी आहे. पुलावरील वाहतूक रोखल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या वाहनांचा खोळंबा झाला आहे.
24 तास उलटूनही रत्नागिरीतील चांदेराई बाजारपेठेतील पाणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. मंगळवारी सकाळी बाजारपेठेत पाणी शिरण्यास सुरवात झाली ते दुपारी 12 वाजेपर्यंत पाण्याची पातळी वाढत होती. मग पाणी जैसे थे होते ते रात्री ओहोटीच्या वेळेस रात्री 1 वाजल्यानंतर थोडे पाणी कमी झाले परंतु आत्ता पुन्हा पहाटे 6 वाजता अचानक पुन्हा पाण्याचा वेग वाढला असून कालच्या पाण्याच्या पातळी पेक्षा आत्ताची पाण्याची पातळी अधिक असून पाणी खूप वेगात वाढत असल्याने चांदेराई हरचिरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सोमवारी रात्री पासून विद्युतप्रवाह खंडित झालेने अनेक नागरिकांच्या मोबाईल चारजींग संपले असल्याने एकमेकांचा संपर्क तुटलाय.त्यात विद्युत प्रवाह तुटल्याने नळपाणी योजनेचे पिण्याचे पाणी सोडता आले नाही त्यामुळे ग्रामस्थांची अधिक गैरसोय पण होते आहे. महावितरणने भोके मार्गे विद्युत प्रवाह तात्काळ सुरू करावा. ग्रामस्थांच्या रोषाला कारणीभूत तुम्ही होऊ नका असा इशारा माजी सरपंच दादा दळी यांनी दिला आहे. भरतीची वेळ नसताना बाजारपेठेत पाणी वाढतंय ही नक्की काळजी करण्याची बाब आहे भरतीची वेळ दुपारी 2 च्या दरम्यान असल्याने प्रशासनाच्या धोके आपत्ती विभागाने सतर्क राहावे अशी सूचना करण्यात आली आहे









