मंगळवारी दिवसभर रिपरिप सुरूच, अधूनमधून दमदार सरी कोसळल्याने व्यापाऱयांची उडाली तारांबळ
प्रतिनिधी/ बेळगाव
मंगळवारी पावसाचा जोर वाढला असून दिवसभर अधूनमधून दमदार सरी कोसळत होत्या. यामुळे साऱयांनाच रेनकोट व छत्रीचा आधार घ्यावा लागला. मागील चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील व्यापाऱयांची तारांबळ उडाली आहे. पावसाचा परिणाम बाजारपेठेवर दिसून आला.
पावसाची सध्या नितांत गरज होती. यामुळे बळीराजाला हा पाऊस दिलासादायक ठरला आहे. भात, भुईमूग आणि सोयाबिन पिकाला हा पाऊस पोषक ठरला आहे. सध्या झालेल्या पावसामुळे सर्व जलाशये, नदीनाले व विहिरींमध्ये बऱयापैकी पाणी आले आहे. हिडकल जलाशयामध्ये बऱयाच अंशी पाणी जमा होत आहे. तर राकसकोप जलाशयालाही बऱयापैकी पाणी आले आहे. त्यामुळे शहराचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
सध्या तरी पावसाने समाधानकारक साथ दिली आहे. मागीलवषी महापुरामुळे फटका बसला होता. त्यामुळे दिलासादायक बाब आहे. सोमवारी रात्रभर आणि मंगळवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे हवेमध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला आहे.
कोरोनामुळे यावषी सर्वसामान्य जनता तणावाखाली आहे. आता पावसाला सुरुवात झाल्यामुळे साथीचे आजार येण्याची शक्मयता आहे. त्यामुळे काहीसी भीती जनतेच्या मनामध्ये आहे. पावसामध्ये भिजल्यानंतर सर्दी, ताप, खोकला यासारखे आजार उद्भवण्याची शक्मयता असते. मात्र जर हे आजार झाले तर कोरोनाच झाला आहे, म्हणून कोणीही घाबरू नये. तातडीने यावर उपचार घेणे गरजेचे आहे. सध्या कोरोनामुळे साधा ताप आला तरी माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण होत आहे. मात्र या हवामानामुळे सर्वसामान्य माणसाला ताप येवू शकतो. तेंव्हा न घाबरता उपचार करून घेणे गरजेचे आहे.
गणेशपूर रोडवर वीजतारांवर झाड कोसळले
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला दमदार पाऊस तसेच सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या वाऱयामुळे गणेशपूर रोडवरील एक झाड विद्युततारांवर कोसळले आहे. सोमवारी सायंकाळी हे झाड कोसळले. मात्र हे झाड काढण्यासाठी तसेच दुरुस्ती करण्यासाठी कोणीच फिरकले नाही. यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.









