ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रोज वेगवेगळी माहिती समोर येत आहे. त्यातच तपासावरुन मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यातील संघर्षही वाढल्याचे चित्र आहे. आता मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येऊन तपास योग्य दिशेने सुरु असल्याचं म्हटलं आहे. तसेच बिहार पोलिसांनी ही केस आमच्याकडे ट्रान्सफर करायला हवी होती, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
परमबीर सिंह म्हणाले की, मुंबई पोलिसांनी आधीच अपघाती मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे. फॉरेन्सिक एक्सपर्ट, डॉक्टरांच्या टीमचा सल्ला घेतला आहे. आतापर्यंत 56 जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तसंच 13 आणि 14 जूनचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेजही आम्ही जप्त केले आहेत. परंतु पार्टी झाल्याचा एकही पुरावा आम्हाला मिळालेला नाही. नैसर्गिक मृत्यू आणि संशयास्पद मृत्यू या दोन्ही बाजूने तपास केला जात आहे. सुशांत सिंह राजपूत यांच्या कुटुंबाचा जबाब नोंदवला आहे. त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही.
दरम्यान, सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात त्याची कथित गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीवर पाटण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर बिहार पोलीस तपासासाठी मुंबईत दाखल झाले. त्यातच पाटण्याचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने होम क्वॉरन्टाईन केल्याने तणाव वाढला आहे.









