कोरोनामुळे माणसाचे जीवन क्षणभंगूर, अशाश्वत झालेले आहे. त्यामुळे कोणाच्याही पाठीमागे उरलेल्यांसाठी आर्थिक तरतूद म्हणून टर्म इन्शुरन्स जीवन पॉलिसी उतरविणे ही काळाची झाली आहे. प्रत्यक्षात खरोखरच लोकांनी कोरोना काळात फार मोठय़ा प्रमाणावर टर्म इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केल्या आहेत. मृत्यूचे प्रमाण वाढत असल्यामुळे बहुतेक सर्व विमा कंपन्या सातत्याने टर्म इन्शुरन्सच्या प्रिमियमची रक्कम वाढवत चालल्या आहेत. काही कंपन्यांनी तर मार्च ते जुलै या कालावधीत तीनवेळा प्रिमियमची रक्कम वाढविली.
टर्म प्लानचे संरक्षण देणे हे वैशिष्टय़ आहे. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कायदेशीर वारसाला जितक्मया रकमेचा हा विमा उतरविला आहे तेवढी रक्कम दावा म्हणून संमत होते. इतर विमा पॉलिसींच्या तुलनेत टर्म इन्शुरन्सचा प्रिमियम कमी असतो. पुढील कोष्टकातील दर हे उदाहरण म्हणून 30 वर्षांच्या व्यक्तीस 1 कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स प्लान घ्यावयाचा असेल तर किती प्रिमियम भरावा लागेल हे दाखवित
आहे-
प्रिमियचे वार्षिक दर रुपयात
| कंपनीचे नाव | कालावधी | मार्च 2020 | मे | जुलै |
|---|---|---|---|---|
| आयसीआयसीआय लाईफ | 40 वर्षे | 12502 | 15089 | 17590 |
| 50 वर्षे | 14697 | 20121 | 20208 | |
| बजाज अलायन्झ लाईफ | 40 वर्षे | 8010 | 8010 | 10911 |
| 50 वर्षे | 8927 | 8927 | 12933 | |
| टाटा एआयए लाईफ | 40 वर्षे | 9912 | 12980 | 12980 |
| 50 वर्षे | 10030 | 13216 | 13219 | |
| एचडीएफसी लाईफ | 40 वर्षे | 12478 | 12601 | 12601 |
| 50 वर्षे | 14626 | 17563 | 17563 | |
| मॅक्स लाईफ | 40 वर्षे | 11210 | 11210 | 11800 |
| 50 वर्षे | 13098 | 13098 | 13452 |
वरील कोष्टकावरून आपल्या लक्षात येते की, मृत्यूचे प्रमाण वाढत असल्यामुळे दावेही पुष्कळ दाखल होत आहेत. ते दावे संमत करता यावेत म्हणून कंपन्यांनी वरचेवर प्रिमियमची रक्कम वाढविली आहे. टर्म इन्शुरन्सचा प्रिमियम मृत्यूंच्या परिणामांनुसार व सरासरी मृत्यूंच्या वयांनुसार ठरविला जातो. पण सध्या या दोन्ही बाबींना काही अर्थच उरला नसल्यामुळे विमा कंपन्यांना वरचेवर फार मोठय़ा प्रमाणात प्रिमियमचा दर वाढवावा लागत आहे. दुसरे कारण म्हणजे गुंतवणुकीवरील व्याजाचे दर भारतात फार कमी कमी होत चालले आहेत. खड्डय़ात रुतलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला खड्डय़ातून बाहेर काढण्यासाठी कर्जावरील व्याज दर घटविले जात आहेत व त्याचा परिणाम म्हणून गुंतवणुकींवरील व्याजदर कमी होत आहेत. त्यामुळे विमा कंपन्यांकडे जो निधी जमतो तो त्यांना योग्य पर्यायांत गुंतवावा लागतो. पण आता यातून परतावा कमी मिळत असल्यामुळे कंपनी आर्थिकदृष्टय़ा सक्षम रहावी म्हणून त्यांना प्रिमियम वाढवावा लागत आहे. प्रिमियमचे दर सध्या चढे असले तरी तुम्ही अगोदर टर्म इन्शुरन्स प्लान घेतलेला नसेल तर तो आवश्य घ्या. हा ऑनलाईन घेण्याची तरतूद/पर्याय उपलब्ध आहे. सिंगापूर आणि अमेरिका या देशांच्या तुलनेत भारतीयांना अजूनपर्यंत तरी टर्म इन्शुरन्सवर कमी दराने प्रिमियम भरावा लागत आहे. मॅक्स लाईफ इंडिया प्रोटेक्शन कोशन्ट एक्स्प्रेस सर्वेनुसार जून-जुलै 2020 मध्ये टर्म इन्शुरन्स विमा उतरविणाऱयांपैकी 41 टक्के विमाधारकांनी कोरोनाच्या भीतीपोटी, कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळावे म्हणून ही पॉलिसी उतरविली आहे, अशी माहिती बाहेर आली आहे.
टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेताना जो प्रिमियम आकारला जातो, हाच दर कायम असतो. यात बदल होत नाही. पण मेडिक्लेम प्रिमियम मात्र दरवषी बदलू शकतो/बदलतो. मेडिक्लेम पॉलिसीचे दरवषी नूतनीकरण करावे लागते. टर्म इन्शुरन्स पॉलिसीचे दरवषी नूतनीकरण करावे लागत नाही. प्रिमियमची रक्कम जी पॉलिसी घेताना असते तीच संपूर्ण कालावधी कायम रहाते. 60 वर्षे हे सेवानिवृत्ती वय असते. d60 वर्षांपर्यंत संरक्षण देणारा कालावधी ठरवावा. साधारणपणे तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 10 ते 12 पट रकमेचा विमा उतरवावा. तुमचे वार्षिक उत्पन्न जर 10 लाख रुपये असेल तर साधारणपणे 1 कोटी 20 लाख रुपयांचा विमा उतरवावा. कोणतीही पॉलिसी घेताना त्या पॉलिसीचे ‘दावा संमत करणे प्रमाण’ (क्लेम्स सेटलमेन्ट रेश्यो) अभ्यासावा. याचे प्रमाण पहावे व नंतरच पॉलिसी उतरवावी!
शशांक गुळगुळे









