कोसलदेशाचा राजा नग्नजित हा अत्यंत धार्मिक होता. त्याची सत्या नावाची मुलगी होती. नग्नजिताची कन्या असल्याने नाग्नजिती या नावानेही ती ओळखली जात होती. तिच्या विवाहासाठी नग्नजिताने काय पण ठेवला तो पहा.
सप्त प्रमत्त मारुतगण । तैसे अपेट बलीवर्द जाण ।
एक्मयाच समयीं त्या बांधून । करी शासन बाहुबळें ।
तया नृपातें नाग्निजिती । वरूनि होईल सुभगा युवती । हें ऐकूनि बहु भूपति । विमुख जाती लाजूनी ।
सत्या पर्णू न शकती भूप । सप्त गोवृष विद्युत्कल्प ।
त्यांतें न जिंकूनियां अल्प । विगलितदर्प बहु जाले ।
राया ऐकें गोवृषांतें । तीष्ष्ण श्रृंगें असती ज्यांतें ।
बळें थडकिती कुंजरांतें । निर्भय पुरते बळराशि ।
न साहती वीरांची घाणी । तरुण बलि÷ फळदुर्गुणी ।
देखतां थडकिती धांवोनी । श्रृंगीं भेदूनि मारक जे ।
ऐसियांतें देखोनि राजे । पर्णू न शकती भूपात्मजे ।
असत्या आयुष्यें वृथा कां मरिजे । असाध्य पैजे भजोनियां ।
ऐसिया योगें नृपाच्या सदनीं । नोवरी उपवर लावण्यखाणी ।
हें ऐकोनि पंकजपाणि । पाणिग्रहणीं प्रवर्तला ।
नग्नजिताकडे सात अत्यंत बलाढय़ मातलेले बैल होते. त्यांना वेसण घालून बांधून एकाच वेळी जो कोणी हजर करील त्याच्याशीच माझी कन्या सत्याचा विवाह होईल असा पण त्या कोसल नरेशाने जाहीर केला होता. हे सात बैल अजिंक्मय होते. त्यांची शिंगे तीक्ष्ण होती. वीरांचा वासही त्यांना सहन होत नसे. त्यांना पकडायला जो बलवान वीर जाई त्याला धडक मारून ते खाली पाडत व मग त्याच्या शरीरात आपली तीक्ष्ण शिंगे खुपसून त्याचा जीव घेत. हे माहीत झाल्यामुळे कोणीही राजा रुपवान सत्याशी विवाह करण्यासाठी पुढे येईना.
कृष्णाला जेव्हा हा सारा वृत्तांत कळला तेव्हा तो स्वरुपसुंदर सत्याशी विवाह करण्याच्या इच्छेने मोठी सेना घेऊन कोसलदेशात आला.
मग तो ऐकूनि कोशलपति । कृष्णदर्शना परम प्रीति ।
पुढें जाऊनि सप्रेम भक्ति । भावें श्रीपति गौरविला ।
साष्टांग घालूनि लोटांगण । स्नेहें दिधलें आलिंगन ।
तेणेंचि न्यायें यदुनंदन । सम्मानिले यूथपति ।
मग आणूनि निजमंदिरा । आसनें अर्पिली यादववीरां । भद्रीं बैसवूनियां श्रीधरा । राजोपचारां समर्पिलें ।
गुरु म्हणिजे परमश्रे÷ । तया अर्हणें श्रीवैकुंठ ।
पूजिता जाला सद्भावनि÷ । तेणें संतुष्ट हरि जाला ।
कोसलनरेश नग्नाजिताला भगवान श्रीकृष्णाच्या आगमनाची वार्ता कळताच तो त्याला सामोरा गेला. त्याने कृष्णाला वंदन केले व त्याचे स्वागत केले. आदराने त्याला आपल्या महालात आणले. तिथे त्याला आदरपूर्वक उच्चासनावर बसविले. मौल्यवान पूजा सामुग्री आणून त्याची मनापासून भक्तिपूर्वक पूजा केली. त्याने कृष्णही प्रसन्न झाला.
कृष्णपूजनाच्या अवसरिं । कोशलपतीच्या अंतःपुरिं ।
गवाक्षमार्गें पाहती नारी । सहित नोवरी नाग्नजिती ।
श्रीकृष्णाच्या लावण्यतेजें । कोटिकंदर्पश्रेणी लाजे ।
वाङ्माधुर्या पीयूष न सजे । तुळणें तुळितां गौनत्वें ।
देवदत्त परुळेकर








