बेळगाव/ प्रतिनिधी
मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात जागोजागी पाण्याची डबकी निर्माण झाल्याने प्रवाशांबरोबर बसचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच रस्त्याची चाळण झाल्याने प्रवाशांना बसस्थानकात धक्के खातच प्रवेश करावा लागत आहे. कित्येकवेळा याबाबत तक्रारी करूनही याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे.
जून महिन्यात झालेल्या पहिल्या पावसापासून या ठिकाणी हिच परिस्थिती आहे. मात्र, याविषयी परिवहन मंडळाला कोणतेच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे आवारात नवीन स्मार्ट बसस्थानकाचे काम सुरू आहे. दुसरीकडे मात्र तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या बसस्थानकात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आधीच कोरोनामुळे प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळे परिवहनला प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. आता मात्र बसस्थानकात येणाऱया प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. आगारात सगळीकडे पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने प्रवाशांना यातून मार्ग काढावा लागत आहे.
बसस्थानकाच्या आवारात दोन-दोन फूट खोल पाण्याची डबकी निर्माण झाल्याने बसचालकांना आगारातून बस बाहेर काढताना कसरत करावी लागत आहे. याबरोबरच बस नादुरुस्त होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.









