कॉ. अण्णाभाऊ साठे म्हणजे श्रमिकांचे विश्वविद्यालय – कॉ. नरसय्या आडम मास्तर
कॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न किताब बहाल करा – माकप ची मागणी
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
लाल बावटा कलापथकाचे प्रमुख संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी साहित्यरत्न, लोकशाहीर कॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिभेला तोड नव्हती, मराठी साहित्यावर मजबूत पकड होती. त्यांची कल्पनाशक्ती, आकलनशक्ती पाहता माणसाला वास्तववादी बनवणारी होती. एका ठिकाणी लिहिताना कॉ. अण्णाभाऊ साठे म्हणतात “भाषांतर ही देखील अत्यंत अवघड कला आहे. वाङ्मय म्हणजे भात नव्हे की तो टोपातून ताटात आणि ताटातून पोटात जायला हवा. वाङ्मय म्हणजे सुगंध आहे. तो एका फुलातून दुसऱ्या फुलात नेणे जेवढे अवघड आहे तेवढेच भाषांतर करणे अवघड आहे.” सामान्य श्रमिकांच्या कुटुंबात जन्मलेले कॉ. अण्णाभाऊ साठे आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे मराठी साहित्यात श्रमिकांचं भावविश्व आणि वास्तव मांडून श्रमिकांचं विद्यापीठ ठरले. या महान लोकशाहिराच्या साहित्याचा जागर करणे हेच खरे अभिवादन ठरेल. महाराष्ट्रच नाव जागतिक पातळीवर नेणाऱ्या कॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न किताब बहाल करावे अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव तथा ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर व माकप चे जिल्हा सचिव अॅड. एम. एच. शेख यांनी भैया चौक येथील कॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना व्यक्त केले.
शनिवार दि. 1 ऑगस्ट रोजी सकाळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर लोकशाहीर कॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी व लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अभिवादन करताना आडम पुढे म्हणाले की, 1 ऑगस्ट हा दिवस अत्यंत ऐतिहासिक आहे. कारण भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जहालमतावादाचा पुरस्कार करून अनेक भारतीयांच्या मनात स्वातंत्र्यासाठी लढण्याची बिजे लोकमान्य टिळक यांनी रुजवली तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत डफाच्या ताफावर आणि पहाडी आवाजाने जीव ओतले. अशी प्रतिभावंत महनीय व्यक्ती सदैव आपणासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा जतन करणे व ते विचार नव्या पिढीला देणे ही काळाची गरज आहे. असे मत व्यक्त केले.
यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अॅड. एम.एच.शेख, नगरसेविका कामिनी आडम, माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी, प्रा.अब्राहम कुमार, दाऊद शेख, दीपक निकंबे,बापू साबळे, अनिल वासम, अशोक बल्ला, दत्ता चव्हाण सनी शेट्टी, मोहन कोक्कुल, बाबू कोकणे, किशोर मेहता, विजय हरसुरे, बाळासाहेब मल्ल्याळ, सिद्धाराम उमराणी, महादेव घोडके, वीरेंद्र पद्मा, राजन काशीद, तानाजी जाधव, बजरंग गायकवाड, अनिल घोडके, प्रकाश कुऱ्हाडकर, जावेद सगरी, सूर्यकांत केंदळे यांच्यासह कार्यकर्ते अभिवादन केले.