लोकमान्य टिळकांचे बेळगावशी दृढ संबंध : स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव याळगी यांनी आठवणींना दिला उजाळा
मनीषा सुभेदार / बेळगाव
स्वातंत्र्यलढय़ाचा काळ म्हणजे अक्षरशः भारलेला काळ होता. स्वातंत्र्यप्राप्ती हेच प्रत्येकाचे ध्येय होते. स्वातंत्र्यलढय़ामध्ये बेळगावचे योगदानही महत्त्वपूर्ण आहे. विशेष म्हणजे लोकमान्य टिळक बेळगावला आल्यावेळी त्यांची जाहीर सभा घेण्यास तत्कालीन कलेक्टरने परवानगी दिली नाही. तेंव्हा आज जेथे ‘तरुण भारत’ची भव्य इमारत उभी आहे, त्या परिसरात पूर्वी फक्त झाडी होती. गोविंदराव याळगी, गंगाधर देशपांडे यांच्यासह अनेकांनी रातोरात ही झाडी दूर करून या ठिकाणी लोकमान्य टिळकांची सभा घेतली. खासगी जागेत सभा झाल्याने सरकारला त्यावर बंदी आणता आली नाही….
लोकमान्य टिळक स्मृती शताब्दीची आज सांगता होत आहे. भारतीय राजकारणामध्ये आणि स्वातंत्र्यलढय़ामध्ये लोकमान्य टिळकांचे विलक्षण असे योगदान आहे. त्यांनी अनेकांच्या मनामध्ये स्वातंत्र्याचे स्फुलिंग पेटविले. बेळगावच्या स्वातंत्र्यसैनिकांनी त्यावेळी लोकमान्य टिळकांना बेळगावमध्ये निमंत्रित करून त्यांच्या सभाही आयोजित केल्या. त्यांच्या बेळगाव भेटीच्या अनेक आठवणी आहेत. याबाबत स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव याळगी यांची भेट घेतली असता त्यांनी या आठवणींना उजाळा दिला.
बेळगावमध्ये 1905 मध्ये गोविंदराव याळगी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. उत्सवाला मिळणारा प्रतिसाद पाहून 1906 मध्ये मोठय़ा प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरले. त्यामुळे गोविंदराव याळगी, गंगाधरराव देशपांडे, कलघटगी यांच्यासह काही मंडळी पुण्याला जावून लोकमान्य टिळकांना निमंत्रण देऊन आली. त्यानुसार 1906 मध्ये रेल्वेने लोकमान्य टिळक बेळगावला आले. स्टेशनवरून त्यांची भव्य मिरवणूक टिळक चौक ते रविवार पेठ या मार्गावरून काढण्यात आली. तेंव्हापासून या चौकाला टिळक चौक हे नाव पडले.
रविवार पेठ येथे लोकमान्य टिळकांचे भाषण झाले. त्यावेळी पाऊस पडत होता. गंगाधरराव देशपांडे यांनी त्यांच्या डोक्मयावर छत्री धरली. पण छत्री नको, असे टिळक म्हणाले. रिसालदार गल्ली येथील डी. व्ही. बेळवी यांच्या निवासस्थानी टिळकांची सोय करण्यात आली होती, असे विठ्ठलराव याळगी यांनी सांगितले.
त्यानंतर 27 एप्रिल ते 1 मे 1916 या दरम्यान काळी आमराई येथे मुंबई प्रांतिक परिषद भरली होती. या परिषदेसाठी लोकमान्य आले होते. महात्मा गांधी व टिळकांची पहिली भेट येथेच झाली. यावेळी याळगी वाडय़ामध्ये टिळकांच्या चहापानाची सोय करण्यात आली होती. याचवेळी गोविंदराव याळगींबद्दल टिळकांचा जिव्हाळा दिसून आला.
गोविंदराव याळगी यांनी खडेबाजारच्या कोपऱयावर दारूबंदीसाठी सत्याग्रह सुरू केला होते. त्यासाठी त्यांना आठ दिवसांची शिक्षा व दहा रुपये दंड झाला होता. दंड न भरल्यास पुन्हा पाच दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही बाब समजताच लोकमान्य टिळकांनी मी दंड भरतो तु कामाला लाग, असे सांगितले. त्यामुळे गोविंदरावांची शिक्षा कमी झाली. ही घटना टिळकांचे गोविंदरावांवरील प्रेम अधोरेखित करते, असे ते म्हणाले.
सुरत येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात काही वादावादी होऊन टिळकांना प्रचंड विरोध झाला. टिळक तेथून टांग्यातून परत निघाले. तेंव्हा त्यांच्या संरक्षणार्थ या अधिवेशनाला गेलेले गोविंदराव याळगी व पुंडलिक कातगडे हे त्यांच्या टांग्यामागे पळत गेले. टिळकांना सुरक्षितता देणे, हे आपले कर्तव्य आहे असे या दोघांनी मानले. अशी आठवणही याळगी यांनी सांगितली.
जर्मनीहून काही क्रांतिकारकांनी लोकमान्य टिळकांना भेट म्हणून एका ब्राह्मणाकरवी 60 हिरे गंगाधरराव देशपांडे यांच्याकडे पाठविले होते. ते मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये ठेवावेत, असा विचार झाला. परंतु काही कारणाने त्यामध्ये अडचणी आल्या. तेंव्हा नरहर भावे, गोविंदराव याळगी, काका पाटील आणि गंगाधरराव यांनी ते हिरे विकून सदर रक्कम पुन्हा त्या ब्राह्मणाला दिली होती. ही आठवणही महत्त्वाची.
लोकमान्य टिळकांसाठी गोविंदरावांनी मेल थांबवून ठेवली
1916 मध्ये होमरुल लीगची स्थापना बेळगावलाच झाली. पुढे त्याचा जोरदार प्रसार येथूनच झाला. ऍनी बेझंट यांनी या लीगचे कार्य तळमळीने चालविले होते. लोकमान्यांवर जनतेचे विलक्षण प्रेम होते. चिकोडी येथे लोकमान्य टिळकांचे भाषण ठरले. ते चिकोडीला आले. परंतु त्यांना कोणत्याही परिस्थितीत दुसरे दिवशी मुंबईला पोहोचायचे होते आणि रात्री 11 वाजता बेळगावहून मेल (रेल्वे) निघत असे. भाषण संपवून येईपर्यंत गाडी चुकणार, अशी अटकळ टिळकांनी बांधली होती. तथापि, गोविंदराव याळगी यांनी स्टेशन मास्तरला विनंती करून मेल उशिरा सोडण्यास सांगितले. भाषण संपवून लोकमान्य रेल्वेस्टेशनला आले आणि आपल्यासाठी गोविंदरावांनी मेल थांबवून ठेवली, हे लक्षात येताच त्यांना भरून आले. गोविंदराव यांचे पोलीस, रेल्वे, टपाल अशा विविध खात्यांमध्ये उत्तम संबंध होते आणि दराराही होता, असे विठ्ठल याळगी यांनी सांगितले.
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!’
नार्वेकर गल्ली येथे आज जेथे ‘तरुण भारत’ची इमारत उभी आहे, ती जोगळेकर यांची जागा होय. 1916 मध्ये लोकमान्य बेळगावला आले तेंव्हा याच परिसरात त्यांचे जाहीर भाषण गोविंदराव याळगी आणि गंगाधरराव देशपांडे यांनी ठरविले. परंतु कलेक्टरने त्यांना परवानगी दिली नाही. रातोरात या दोघांनी या जागेवरील सर्व झाडी काढून ती स्वच्छ करून तेथे सभेचे आयोजन केले. याच सभेमध्ये ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, ही गर्जना केली.









