कोरोना बाधित रुग्ण संख्या 373 : सक्रिय रुग्ण संख्या 95 : संदेश पारकर यांची कोरोनावर मात
- संदेश पारकर यांचा भाऊ / कोरोना पॉझिटिव्ह
- सावंतवाडी, कणकवली शहरात नव्याने प्रत्येकी एक पॉझिटिव्ह
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोना रुग्णांची संख्या आता झपाटय़ाने वाढू लागली असून शुक्रवारी आणखी नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 373 वर गेली आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्याही वाढून 95 झाली आहे. नव्याने आढळलेल्या नऊ रुग्णांमध्ये संदेश पारकर यांच्या भावाला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान आमदार वैभव नाईक यांच्यानंतर आता शिवसेना नेते संदेश पारकर यांनीही कोरोनावर मात केली आहे. त्यांना शुक्रवारी जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.
जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना रुग्ण संख्या वाढू लागल्याने कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होऊन कोरोना संसर्ग वाढीचा धोका वाढला आहे. एकूण कोरोना बाधित रुग्णसंख्या 372 झाली आहे. नव्या नऊ रुग्णांमध्ये कणकवली तालुक्यात नांदगाव एक, घोणसरी दोन, कणकवली शहर एक, सावंतवाडी तालुक्यात इन्सुली दोन, कारिवडे एक, सावंतवाडी एक आणि पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये कोरोना तपासणी करण्यात आलेल्या एका रुग्णाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला असून त्याचे गाव समजू शकले नाही. जिल्हय़ात आतापर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 373 झाली आहे. त्यापैकी 272 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ात सद्यस्थितीत कोरोना सक्रिय 95 रुग्ण आहेत.
आमदार नाईक यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली होती. आमदारांपाठोपाठ संदेश पारकर यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटर मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती उत्तम असल्याने दहा दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, डॉक्टर, नर्स उपस्थित होते.
डिस्चार्जनंतर पारकर यांनी आरोग्य सेवेबाबत समाधान व्यक्त करताना जनतेच्या शुभेच्छामुळे कोरोनावर मात करता आल्याचे सांगितले. तसेच आपण प्लाझमा थेरपी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कुडाळ, कणकवली, सावंतवाडी तालुक्मयांमध्ये नवीन कंटेनमेंट झोन
कुडाळ येथील कामळेवीर बाजार, सोनवडे-भरडवाडी व रानबांबुळी-परबवाडी येथे 500 मीटर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती कुडाळ उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर यांनी दिली. कणकवली तालुक्मयातील कुंभवडे-बामणवाडी येथील राजेंद्र वासुदेव गुळगुळे यांच्या घराजळील 50 मीटर परिसरात कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली. सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा-देऊळवाडी कार्यक्षेत्राच्या हद्दीमध्ये कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती सावंतवाडी उपविभागीय अधिकारी यांनी दिली.
वरील सर्व कंटेनमेंट झोनमध्ये 12 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील. सदर आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था, बँक इत्यादींना लागू असणार नाहीत, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 6212
अहवाल प्राप्त झालेले नमुने 6038
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 373
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 5717
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 134
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 95
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 6
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 272
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 127
शुक्रवारी तपासणी केलेल्या व्यक्ती 4312
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 18210
शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती 54
गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 14676
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 3480
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 160432
सद्यस्थितीत सक्रीय कंटेनमेंट झोन 38









