ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर सुरु असलेल्या वादात आता महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी उडी घेतली आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांऐवजी केंद्रीय यंत्रणांकडून तपास करण्याची गरज आहे, असे म्हटले.
फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण CBI विभागाकडे सोपवण्यात यावा, अशी भावना मोठ्या प्रमाणावर सामान्यांमध्ये आहे.परंतु, राज्य सरकार त्यासाठी तयार नाही. राज्य सरकारची ही आडमुठी भूमिका पाहता किमान सक्तवसुली संचलनालयाला ED याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी. कारण या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार आणि खंडणीचा पैलू समोर आला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
दरम्यान, 14 जून रोजी सुशांतने मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. तेव्हापासून त्याच्या आत्महत्या प्रकरणीचे अनेक धागेदोरे समोर येऊ लागले आहेत. अनेक अंगांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे काम मुंबई पोलिसांनी हाती घेतले आहे. त्यातच सुशांतच्या कुटुंबीयांनी आता त्याची कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात पाटणा येथे तक्रारही दाखल केली.