प्रतिनिधी /पणजी :
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार लोकनियुक्त सरकारे पाडीत सुटल्याने त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने देशव्यापी कार्यक्रम सुरु केला आहे. त्याचाच भाग म्हणून काल 30 रोजी येथील राजभवनावर प्रदेश काँग्रेसने मोर्चा नेला मोदी सरकारचा निषेध करीत मोदी सरकार विरोधात घोषणबाजी केली. यावेळी राजभवन परीसरात पोलीस बंदोबस्तही कडक तैनात करण्यात आला होता. शेवटी काँग्रेसने राज्यपालांना निवेदन सादर केले.
विरोधी पक्षनेते तथा मडगावचे आमदार दिंगबर कामत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा नेण्यात आला होता. यावेळी उत्तर गोवा खासदार फ्रान्सिस सार्दीन, काँग्रेस प्रदेशआध्यक्ष गिरीश चोडणकर, सरचिटणीस व माजी आमदार आग्नेल फार्नांडिस, जनार्धन भंडारी, जोसेफ सिक्वेरा, माजी आमदार प्रताप गावस, महिला मोर्चा अध्यक्षा प्रतीमा कुतीन्हो, प्रवक्ता संकल्प आमोणकर तसेच सुमारे 120 कार्यकर्ते उपस्थित होते. लोकशाही वाचवा, भारतीय घटना वाचवा, असे फलक हातात घेऊन मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
मणीपूर व गोव्यात जनतेने सरकार घडविण्यासाठी काँग्रेसला कौल दिला होता पण भाजपाने जनतेवर आपले सरकार लादले मध्यप्रदेश कर्नाटका आणि गोवा राज्यामध्ये लोकनियुक्त सरकारे पाडण्याचे काम मोदी सरकारने केले. आता राजस्थानमध्ये तेच कारस्थान सुरु आहे. त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस निदर्शने करीत असल्याचे दिगंबर कामत यांनी सांगितले. केंद्र सरकारने मनमानी कारभार चालविला आहे. लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. केवळ सत्ता स्थापन करण्यासाठी हपापलेला भारतीय जनता पक्ष सर्व नियम धाब्यावर बसवून मतदारांनी दिलेल्या कौलाचा अपमान करीत आहे. अशा या सरकारचा आम्ही तीव्र निषेध करीत असल्याचे कामत यांनी सांगितले.









