मंत्री निलेश काब्राल यांची माहिती
प्रतिनिधी / धारबांदोडा
जनतेसाठी कोरोना निगा केंद्राची सुविधा उपलब्ध करून देणारे गोवा हे एकमेव राज्य आहे. इतर राज्यात ही सुविधा नाही. शिवाय इतर राज्यापेक्षा गोव्यात स्वॅब टेस्टींग करण्याचे प्रमाण जास्त आहेत. धारबांदोडा तालुक्यात कोरोनाचा प्रसार नियंत्रणात असून गरज भासल्यास येथील निगा केंद्र सुरु करण्यात येईल अशी माहिती वीजमंत्री निलेश काब्राल यांनी दिली.
कोरोना देखरेखीसंबंधी धारबांदोडा तालुक्याची जबाबदारी मंत्री निलेश काब्राल व स्थानिक आमदार तथा बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी त्यांनी चौथी बैठक घेऊन तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. मंत्री दीपक पाऊसकर, उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक व मामलेदार शर्मिला गावकर हे यावेळी उपस्थित होते. प्रत्येक नागरिकांनी योग्य खबरदारी घेतल्यास कोरोनाचा संसर्ग कमी होऊ शकतो. सरकार आपल्यापरिने प्रयत्न करीत आहेत. जनतेकडूनही योग्य सहकार्य मिळणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
धारबांदोडय़ात सध्या कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असून त्याचे श्रेय नागरिकांना द्यावे लागेल. सर्वांनी योग्य खबरदारी व अजून चांगले सहकार्य केल्यास धारबांदोडा तालुका कोरोनामुक्त होणे शक्य आहे, असे मंत्री दीपक पाऊसकर यावेळी बोलताना म्हणाले. तालुक्यात सध्या 14 कोरोनाबाधीत रुग्ण असून आत्तापर्यंत 36 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या आठवडय़ात एकूण 94 लोकांचे स्वॅब नमुने घेण्यात आल्याची माहिती डॉ. विल्सन फर्नांडिस यांनी दिली. कुळे पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्याबद्दल 108 जणांना तर कुडचडे पोलिसांनी 23 लोकांना दंड ठोठावला आहे. शिवाय धारबांदोडा पंचायत क्षेत्रात 15 जणांना दंड देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. बैठकीला कुळे शिगांवचे सरपंच गंगाराम लांबोर, मोलेचे उपसरपंच सुशांत भगत, साकोर्डाचे सरपंच जितेंद्र नाईक, दाभाळचे उपसरपंच शशिकांत गांवकर, पंचसदस्य विनायक गांवस, दिनानाथ गावकर, रमाकांत गावकर, निशा शिगावकर, नंदेश देसाई, सावर्डे जिल्हा पंचायत सदस्य सुवर्णा तेंडुलकर, कुळे पंचायतीचे सचिव खुशालदास गावकर, दाभाळ पंचायतीचे सचिव संजीव नाईक, मोले पंचायतीचे सचिव अमोल तेंडुलकर, धारबांदोडा पंचायतीचे सचिव विजय नाईक, गटविकास अधिकारी श्री. राणे, कुळेचे पोलीस उपनिरीक्षक अजय धुरी, फोंडय़ाचे उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर, कुडचडेच्या उपनिरीक्षक करिश्मा प्रभू आदी उपस्थित होते. तिस्क उसगांव येथील अवंतीनगर व सिद्धेश्वरनगर भागात मोठय़ा संख्येने रुग्ण आढळून आले आहेत. हे दोन्ही भाग धारबांदोडा पंचायतीला लागून असल्याने शिवाय तिस्क ही मुख्य बाजारपेठ असल्याने दोन्ही भागातील नागरिकांचा परस्परांशी संबंध येतो. लोकांचा हा वावर नियंत्रणात ठेवण्यासाठी पुढील काही दिवस पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी पंचसदस्य विनायक गांवस यांनी केली. जे सरकारी कर्मचारी पोझिटीव्ह आढळले आहेत त्यांची सर्वात आधी व तातडीने चाचणी करावी, अशी मागणी सरपंच गंगाराम लांबोर व जितेंद्र नाईक यांनी केली.









