कर्नाटक सरकारी आयुष डॉक्टर संघटनेचे निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सेवा बजावत आहे. दिवसभर आम्ही सेवा देतो. असे असताना ऍलोपॅथिक आणि आयुर्वेदिक डॉक्टरांच्या वेतनामध्ये भेदभाव केला गेला आहे. ती तफावत दूर करून आम्हालाही ऍलोपॅथिक डॉक्टरप्रमाणेच वेतन द्यावे, अशी मागणी कर्नाटक सरकारी आयुष डॉक्टरांच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार सातवा वेतन आयोग लागू करावा, वेतन भत्ता द्यावा, कोविड-19 काळामध्ये ज्या डॉक्टरांनी सेवा बजावली आहे त्या डॉक्टरांना प्रोत्साहन धन द्या, निवृत्तीनंतर ऍलोपॅथिक डॉक्टरांप्रमाणेच आम्हालाही पेन्शनसह इतर सुविधा द्याव्यात, अशी मागणी निवेदनात केली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी अनेक आयुर्वेदिक डॉक्टर पुढे येत आहेत. त्यांना सेवा बजावण्यास मुभा द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष कुबेर एच. नाईक, डॉ. श्रीमंत शिंगे, डॉ. गिरीश होळेण्णावर, उपाध्यक्ष डॉ. रविंद्र मुदगौडर, डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. बी. एस. झेंडे, अब्दुल रजाक यांच्यासह इतर डॉक्टर उपस्थित होते..









