प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व जिल्हय़ातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे पोलीस दलाचीही धास्ती वाढली आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांचा आकडा 3 हजाराच्या घरात आहे. लॉकडाऊनपासून रस्त्यावर उभे राहून सेवा बजावलेले अधिकारी व पोलिसांनाही आता कोरोनाची धास्ती वाढली आहे. अनेक अधिकारी व पोलीस विश्रांतीवर असल्याची माहिती मिळाली आहे.
लॉकडाऊनच्या काळात कमीतकमी मनुष्यबळात पोलीस दलाने उत्तम सेवा बजावली आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पोलीस दलातील अधिकारी व पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या येवू लागल्या. खास करून कोगनोळी तपास नाक्मयावर सेवा बजावलेल्या पोलिसांना धोका अधिक होता.
बेळगाव शहरात अनेक गुन्हेगारी प्रकरणात धरपकड केलेल्या आरोपींना कोरोनाची लागण झाल्यानंतर पोलिसांना काळजी घ्यावी लागली. सुरुवातीला कॅम्प पोलिसांनी अटक केलेल्या एका तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कॅम्प पोलीस स्थानक सीलडाऊन करावे लागले. पोलीस निरीक्षकासह 12 हून अधिक जणांना क्वारंटाईनमध्ये जावे लागले होते.
सुपारी घेऊन खुनी हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तरुणाचा अहवाल पुण्यात पॉझिटिव्ह आला. काकती पोलिसांनी पत्नीच्या खुनाच्या प्रयत्न केल्याच्या आरोपारून अटक केलेल्या युवकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. सिव्हिल हॉस्पिटलवर हल्ला करून रुग्णवाहिका पेटविल्याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी अटक केलेल्या 22 पैकी 13 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
त्यामुळे साहजीकच पोलीस व अधिकाऱयांना धोका वाढला आहे. अनेक अधिकारी व पोलिसांना सध्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन पोलीस स्थानकात येणाऱया नागरिकांना पोलीस स्थानकाबाहेरच बसवून त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
20 हून अधिक कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह
धरपकड केलेल्या गुन्हेगारांमुळे अधिकारी व पोलिसांना कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यामुळे गुन्हेगारांना अटक करणेही कठीण जात आहे. हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील परिस्थितीही बिघडली आहे. 20 हून अधिक कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नव्या कैद्यांना कारागृहात प्रवेश देणे त्यांना अवघड जात आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असली तरी बाधितांवर कोठे उपचार करायचे, हाही मोठा प्रश्न आहे.









