युनायटेडच्या तीन विद्यार्थ्यांचा समावेश
प्रतिनिधी/ रत्नागिरी
दहावी परीक्षा निकालात कोकण बोर्डाने 98.77 टक्के निकालासह राज्यात सलग 9 व्यांदा अव्वल स्थान कायम राखले आहे. जिल्हय़ातील विद्यार्थ्यांनीही गुणांचे नवे उच्चांक प्रस्थापित करताना 6 विद्यार्थ्यांनीही पैकीच्या पैकी गुण मिळवत शंभर नंबरी यश मिळवले आहे. यामध्ये चिपळुणच्या युनायटेड इंग्लिश स्कुल या एकाच शाळेच्या तीन विद्यार्थ्यांनी ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’नुसार 500 पैकी 500 गुण मिळवले आहेत.
युनायटेडच्या अथर्व बापट, श्रेया पातकर व साक्षी साळवी या तिघांनी शंभर टक्के गुण मिळवले आहेत. याबरोबरच रत्नागिरीच्या फाटक हायस्कूलची गिरीजा शैलेश आंबर्डेकर, जीजीपीएसच्या दिशा महेश पर्शराम, खेडच्या ज्ञानदीप विद्यामंदीरची निधी भुवड यांनीही शंभर टक्के यशाला गवसणी घातली आहे.
272 शाळा 100 टक्के
रत्नागिरीत 272 विद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. यामध्ये चिपळुण तालुक्यात सर्वाधिक 51 हायस्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे. त्याखालोखाल खेड तालुक्यात 46, रत्नागिरी व दापोली 33, राजापूर 31, संगमेश्वर 24, गुहागर 22, मंडणगड व लांजामधील 16 हायस्कुलचे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
38 टक्के विद्यार्थ्यांना डिस्टींक्शन
निकालाच्या टक्केवारीत राज्यात अव्वल राहतानाच कोकणातील मुलांनी विशेष गुणवत्तेतही आपला वरचष्मा राखला आहे. रत्नागिरी जिल्हय़ातील 38 टक्के विद्यार्थ्यांनी डिस्टींक्शन मिळवले आहे. तर काठावर पास होणाऱयांची संख्या केवळ अडीच टक्क्यांच्या आसपास आहे.
निकालात 10 टक्केने वाढ
कोकण बोर्डाचा निकाल 98.77 टक्के लागला असून आतापर्यंतचा हा सर्वाधिक निकाल आहे. गतवर्षीच्या निकालात 10.39 टक्केने वाढ झाली आहे. बोर्डात सिंधुदुर्ग जिह्याने आपला दबदबा कायम राखत 98.93 टक्के निकाल दिला असून रत्नागिरी जिह्याचा निकार 98.69 टक्के लागला. यावर्षीही मुलीच सरस ठरल्या आहेत. 2012 पासून कोकण विभागीय मंडळ अस्तित्त्वात आले. पहिल्या वर्षापासूनच कोकण बोर्डाने राज्याच्या निकालात आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
या परीक्षेसाठी रत्नागिरी जिह्यातून 22,547 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 22,506 विद्यार्थी परीक्षेला बसले. यातील 22211 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिह्यातून 11185 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. पैकी 11180 विद्यार्थी परीक्षेला बसले आणि 11060 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण मंडळात एकूण 33,686 पैकी 33,271 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 98.39 टक्के व मुलींचे 99.16 टक्के आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 0.77 टक्के अधिक आहे.
पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारीही वाढली आहे. रत्नागिरीतून 1353 विद्यार्थ्यांपैकी 1059 विद्यार्थी (78.27 टक्के) उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिह्यातून 460 विद्यार्थ्यांपैकी 355 उत्तीर्ण (77.17 टक्के) झाले.
रत्नागिरीतील 414 माध्यमिक शाळांसाठी 73 परीक्षा केंद्रे व सिंधुदुर्गातील 228 शाळांसाठी 41 परीक्षा केंद्रे होती. परीक्षेसाठी 103 मुख्य केंद्रे होती. संभाव्य कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी 28 शाळांमध्ये चित्रीकरण करण्यात आले. 19 शाळांना भरारी पथकांनी भेट देऊन पाहणी केली. मात्र कोकणात कॉपीचे प्रकार घडले नाहीत.
गुणपडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज
गुणपडताळणीसाठी 30 जुलै ते 8 ऑगस्ट व छायाप्रतीसाठी 30 जुलै ते 18 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन करता येणार आहे. त्याचबरोबर ऑनलाइन पद्धतीने शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेटबँकिंगद्वारे भरता येणार आहे. मार्च 2020च्या दहावीच्या परीक्षेस सर्व विषयांसह बसून उत्तीर्ण होणाऱया विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोन श्रेणी, गुण सुधार योजना उपलब्ध राहणार आहेत.









