पेंटर असोसिएशनचा निर्णय :
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. आता स्वतःच दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे बुधवार दि. 29 पासून पेंट्स दुकाने दुपारी 2 नंतर बंद ठेवण्याचा निर्णय पेंटर असोसिएशनने घेतला आहे. त्याची ग्राहकांनी तसेच पेंटर व्यावसायिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दि. 10 ऑगस्टपर्यंत दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहर व उपनगरांमध्ये पेंट्सची मोठय़ा प्रमाणात दुकाने आहेत. पेंट खरेदी करण्यासाठी ग्राहक रात्री उशिरादेखील येत आहेत. मात्र कोरोनामुळे ग्राहकांना सेवा देणे अवघड जात आहे. आता प्रत्येकानेच स्वतःची दखल स्वतः घेणे गरजेचे आहे. पेंट्स दुकानांमध्येही कामगार मोठय़ा प्रमाणात राहतात. त्याचबरोबर ग्राहक बाहेरून येवून पेंट्स खरेदी करतात. त्यावेळी सोशल डिस्टन्स ठेवणे अवघड जात आहे. म्हणून हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. तरी पेंट्स दुकानदारांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी अध्यक्ष सुधीर चौगुले, सेपेटरी विजय दरगशेट्टी, किशोर पोरवाल, माजी अध्यक्ष आर. आय. पाटील यांच्यासह पेंट्स असोसिएशनचे पदाधिकारी आणि व्यावसायिक उपस्थित होते.