खांडव वन खायला मिळाल्याने प्रसन्न झालेल्या अग्नीने अर्जुनाला गांडीव धनुष्य, चार पांढरे घोडे, एक रथ, अक्षय बाणांचे दोन भाते आणि शस्त्रास्त्रांनी न तुटणारे एक कवच दिले. आवश्यक तेव्हा आपल्या सेवेत मी हजर होईन असे सांगून अग्नीने कृष्णाला वंदन केले व त्यांचा निरोप घेतला.
एवं आनंदें इंद्रप्रस्थीं । धर्मा निकटीं करितां वसती। देवकी वसुदेव हलधर चित्तीं । आठवी श्रीपति औत्सुक्मये । मग पुसोनि कुरुनरेशा । नमस्कारूनि पितृष्वसा । हस्तें स्पर्शोनि द्रौपदी शिरसा । आज्ञा घेता हरि जाला ।
कृष्ण बरेच दिवस इंद्रप्रस्थ नगरीत धर्मादि पांडवांसोबत राहिला होता. त्याला आपले वडील वसुदेव, आई देवकी व बंधू बलराम यांची नेहमी आठवण येई. काही दिवसांनी अर्जुन, द्रौपदी आणि इतर संबंधितांचा निरोप घेऊन कृष्ण, सात्यकी इत्यादींसह पुन्हा द्वारकेला परतला. कालिंदीसह आलेल्या कृष्णाचे द्वारकेत मोठय़ा उत्साहात स्वागत करण्यात आले.
यानन्तरें उत्तम दिवसीं । भद्रासनीं नृपापासीं। वसुदेवादि हृषीकेशी । संकर्षणेंशीं उपविष्ट । प्रसंगें नृपाचिये कर्णीं । वृत्तांत जाणवी सुनंदपाणि। कालिंदीचिये पाणिग्रहणीं । यथाविधानीं हा काळ । रायें पाचारिलें ब्राह्मण । पुरोहित ज्योतिषी विधानज्ञ। तिहीं केलें कालज्ञान । पंचांगपठन करूनियां । ऋतु वरि÷ कुसुमाकर । वैशाख माधव श्रेयस्कर । उच्चासनारूढ भास्कर । ऊर्जितविभवें विराजित । अखिल मंगळां मंगलायतन । तो श्रीकृष्ण कल्याणभुवन । त्याचें साधावया सुलग्न । मंगळ दिन द्विज पाहती । ताराबळ चंद्रबळ । वाक्पति विद्यादैवबळ । गोचरप्रकरणीं पाहोनि अमळ । दैवज्ञ कुशळ विचारिती । देष्काण होरा नवांश ग्रह। द्वादशांश त्र्यंशांश षड्वर्गसमूह । ज्याचे अधिपति शुभग्रह । करिती निर्वाह विवरूनी ।गोत्रनिर्णय वर्णात्मकां । राशिचिंतन अनुलोमप्रमुखां । पंचकोत्तीर्ण लग्नघटिका । इष्ट बलि÷ विलोकिलें। लाभीं सर्व शुभावह । केन्दीं त्रिकोणीं सौम्य ग्रह । सहज शत्रुभुवनीं निचय । पापग्रहांचा शुभफलद । ऐसी करूनियां विचारणा। लग्नपत्रिका वर्तिली जाणा। हळदी लावूनि दोघां जणां। देवकप्रति÷ा पैं केली। ऊर्जित दैवें ओंपुण्यकाळ। लग्नविधान शुभमंगल । ब्राह्मण तपोधन निर्मळ । भूभुजमेळ सुहृदांचा ।वाजंत्रांची एक घायी । सुरवर सुमनें वर्षती पाहीं । परमानंद सर्वां देहीं। कृष्णविवाहीं वोसंडे । धनें गोधनें वांटिलीं द्विजां। भद्रासनीं आहुकराजा । सुहृदीं अहेरिं पूजिला वोजा । गरुडध्वजा लक्षूनी । देवकी रोहिणी सापत्न जननी । वरमाता या वरि÷ मानीं । बैसोनि मिरवती सुखासनीं। वाद्यगायनीं पुरगर्भीं । समस्तां सदनीं महोत्सव । वऱहाडी भोजान्धक यादव । रामप्रमुख वासुदेव । अहेरगौरव यां करिती । मंगलमंडित षोडश दिवस। लक्ष्मीपूजन गृहप्रवेश । निरवूनियां भाणवसास । गृहस्थ जगदीश चौघींसीं ।
द्वारकेत आल्यानंतर विवाहासाठी योग्य ऋतू आणि मुहूर्त पाहून त्या मुहूर्तावर कृष्णाने संबंधितांना परम मंगल आणि परमानंदाची प्राप्ती करून देण्यासाठी कालींदीचे पाणिग्रहण केले. देवदत्त परुळेकर








