जिल्हय़ात 93 ठिकाणी 280 सीसीटीव्ही कॅमेरे : जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हा अधिक सुरक्षित होण्याच्या दृष्टीने संपूर्ण जिल्हय़ात सीसीटीव्ही कॅमेऱयांची आता नजर राहणार आहे जिल्हय़ात 93 ठिकाणी 280 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. जिल्हा वार्षिक योजनेमधून पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱयामुळे गुन्हेगारीचे प्रमाण रोखले जाऊन जिल्हय़ातील नागरिक आणि पर्यटकांमध्ये सुरक्षितता निर्माण होणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली. सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याचा ऑनलाईन शुभारंभ 28 जुलैला सायंकाळी चार वाजता पालकमंत्री उदय सामंत याच्या हस्ते होणार आहे.
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्हय़ात येणाऱया प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितता हवी आहे. त्यामुळे सुरक्षितता चांगली मिळाली, तर पर्यटक वाढतील आणि स्थानिक लोकांना पर्यटन व्यवसायामधून उत्पन्न मिळेल तसेच जिल्हय़ातील गुन्हय़ांचे प्रमाण कमी होईल. महिला व बालकांवर होणाऱया अत्याचाराला आळा बसेल. आपत्कालीन परिस्थितीत मनुष्य हानी टाळता येईल. महामार्ग व शहरातील रस्त्यांवर वाहनांना शिस्त लागेल. हरवलेल्या वस्तू किंवा व्यक्ती यांचा शोध घेण्यास मदत होईल, या उद्देशाने जिल्हा वार्षिक योजना 2019-20 मधून 4 कोटी 98 लाख रुपये मंजूर करण्यात आले आणि या निधीतून संपूर्ण जिल्हय़ात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत
93 ठिकाणी 280 कॅमेरे
संपूर्ण जिल्हय़ात सीसीटीव्ही कॅमेऱयाची नजर राहण्यासाठी 93 ठिकाणी 280 कॅमरे बसविण्यात आले आहेत. यामध्ये कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, साटेली-भेडशी, बांदा, देवगड, वैभववाडी, मालवण आदी शहरांतील एकूण 59 ठिकाणी कॅमेरे बसवले आहेत. तसेच म्हापण, परुळे, पाट, आंबोली, मळगाव, वेताळबांबर्डे, पणदूर, कसाल, आचरा, कुणकेश्वर, शिरगाव, नांदगाव, भुईबावडा, पडेल अशा 18 ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
जिल्हय़ातील सहा रेल्वे स्थानके, तीन कोस्टल जेटी, सात सीमा चेकपोस्ट येथेही कॅमेरे बसविले आहेत. रिमोट अनौसिंग यंत्रणा 23 शहरांमध्ये बसविली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱयाद्वारे नजर ठेवली जात असताना चार मेगाफिक्सल नाईटव्हिजन 210 बुलेट कॅमरे, रंगीत नाईटव्हिजन 30 बुलेट कॅमेरे आहेत. 600 टेराबाईटसने स्टोअरेज सुविधा 45 दिवस फुटेज राहू शकते.
जिल्हा नियंत्रण कक्ष तसेच पोलीस ठाणे पातळीवर लाईव्ह कॅमेरा देखरेख व प्ले बॅक, प्रत्येक कॅमेऱयामध्ये साठवण सुविधा व पॉवर बॅकअप होते. जिल्हा नियंत्रण कक्ष येथे 22 फूट रुंद हाय डेफिनिशन व्हीडिओ व्हॉल आणि व्हीडिओ व्यवस्थापन सर्व्हर, स्टोअरेज सुविधेसह सुसज्ज आहे. हायस्पीड फायबर ऑप्टिक नेटवर्क आहे.
अशा प्रकारे संपूर्ण जिल्हा सीसीटीव्ही कॅमेऱयांमध्ये येणार असून गुन्हेगारीला आळा बसून जनतेची सुरक्षितता अधिक वाढेल, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी व्यक्त केला. सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याचा शुभारंभ पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहामध्ये केला जाणार आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ केला जाणार असून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यावेळी उपस्थित राहणार आहेत.









